महाराष्ट्रातून गेल्या वर्षी ६३ हजार महिला बेपत्ता

१८३ जणींची अनैतिक संबंधांतून हत्या – अहवाल
मुंबई – गेल्या वर्षी (२०२०) महाराष्ट्रातून तब्बल ६३ हजार महिला बेपत्ता झाल्या होत्या. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून ही हादरवणारी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी जवळपास २३ हजार महिलांविषयीचे गूढ अद्यापही कायम आहे. महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काळजी व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात गेल्या वर्षी २ हजार १६३ हत्येच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये ५६४ महिलांचा समावेश होता. त्यापैकी ११६ जणींची प्रेम प्रकरणातून, तर १८३ जणींची अनैतिक संबंधांतून हत्या झाल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. हुंडाबळी गेलेल्या महिलांचे प्रमाणही लक्षणीय असल्याची माहिती अहवालात आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षात महिलांविरोधातील सर्वाधिक गुन्हे (४९ हजार ३८५) उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आले होते. यामध्ये खून, बलात्कार, लैंगिक अत्याचार, विनयभंग, अपहरण, हुंडाबळी यांसारख्या विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांत यूपीनंतर पश्चिम बंगाल (३६ हजार ४३९) आणि राजस्थान (३४ हजार ५३५) यांचा क्रमांक लागतो, तर या यादीत महाराष्ट्र (३१ हजार ९५४) चौथ्या स्थानावर आहे. आदल्या वर्षीच्या म्हणजेच २०१९ च्या तुलनेत राज्यातील महिलांविरोधी गुन्ह्यांचा आकडा ५ हजार १९० ने घटला आहे.
मुंबईत ९९९ अल्पवयीन मुलींचे अपहरण
२०२१ वर्षातील पहिल्या ११ महिन्यांत मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणप्रकरणी ९९९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यापैकी ८५९ गुन्ह्यांची उकल झाली आहे, मात्र १४० बेपत्ता मुलींचे गूढ अजूनही कायम आहे. आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील सर्वाधिक व्यक्ती बेपत्ता आहेत. त्यांची संख्या १ लाख ९ हजार ५८५ च्या घरात आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील ६३ हजार २५२ महिला बेपत्ता झाल्या असून, २३ हजार १५७ जणींचा शोध अजूनही लागलेला नाही. यात दीड हजार अल्पवयीन मुलींचाही समावेश असून, काही जणी प्रेम प्रकरणातून पळून गेल्याचे बोलले जाते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …