- किशोरी पेडणेकर पत्रकार परिषदेत भावनिक
- पत्र लिहिणारा निघाला वकील
- महापौरांना सुरक्षा द्या – अतुल भातखळकरांची मागणी
मुंबई – महापौर किशोरी पेडणेकर यांना अश्लील भाषेत पत्र लिहून जिवे मारण्याची धमकी मिळाली होती, दरम्यान या पत्राचा अखेर खुलासा झाला आहे. हे पत्र उरणमधील विजेंद्र म्हात्रे नावाच्या वकिलांनी पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वरळी सिलिंडर स्फोट प्रकरणावरून महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यात वाद पेटला होता, पण या प्रकरणाला शुक्रवारी एका धमकी पत्रामुळे धक्कादायक वळण मिळाले. महापौरांना अश्लील भाषेत पत्र लिहून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या धमकी पत्राबद्दल मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आलीे. पत्रकारांशी बोलत असताना किशोरी पेडणेकर यांनी या पत्राबद्दल धक्कादायक खुलासा केला. त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, धमकी पत्र मला शुक्रवारी सकाळी मिळाले. गेली ४० वर्ष राजकारणात असून, चारित्र्य जपले. शुक्रवारी सकाळी एक पत्र मिळाले. या पत्राची भाषा अत्यंत लज्जास्पद आहे. मारून टाकू, विटंबना करू, मुलगा आणि नवऱ्याला मारून टाकू, तुमच्या अवयवांची विटंबना करू अशी भाषा वापरली आहे, हे अत्यंत किळसवाने होते, असे सांगताना महापौर किशोरी पेडणेकर भावनिक झाल्या व त्यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळू लागले. महिलांचा मान आपण राखतो, पण आता राजकीय टीका स्तर खालावत चालला आहे. मला वापरलेले शब्द क्लेशकारक आहेत. विजेंद्र म्हात्रे या नावाच्या व्यक्तीने हे पत्र लिहिले आहे. हे पत्र उरणमधून पाठवले आहे. पोस्टल पनवेलच आहे. विजेंद्र म्हात्रे याने हे पत्र लिहिले असून तो एक वकील आहे, असेही त्या पत्रात लिहिल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली.
महापौर पेडणेकरांना सुरक्षा द्या – अतुल भातखळकर
भाजप नेते अतुल भातखळकर यासंदर्भात बोलताना म्हणाले की, त्या पत्राचा संबंध महापौरांनी भाजपशी जोडलेला नाही. तातडीने महापौरांना सुरक्षा दिली पाहिजे. राज्य सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे. मुंबईच्या प्रथम नागरिक किशोरी पेडणेकर यांना आलेल्या धमकीची दखल घेऊन तातडीने कारवाई केली पाहिजे, असेही अतुल भातखळकर म्हणाले.