महापालिका निवडणुकांसाठी मनसे-भाजप एकत्र येणार का?; मनसे अध्यक्षांच्या भेटीनंतर प्रसाद लाड म्हणतात…

मुंबई – भाजप व मनसे युतीचे नवे समीकरण पाहण्यास अनेक जण उत्सुक आहेत, तसेच मागील अनेक दिवसांत भाजप ज्येष्ठ नेत्यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी वाढलेल्या फेऱ्यांमुळे दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते या निर्णयाकडे डोळे लावून आहेत. अशात भाजप विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने या चर्चा नव्याने सुरू झाल्या. या बैठकीनंतर प्रसाद लाड म्हणाले की, राज ठाकरे यांच्याशी मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. जेव्हा दोन नेते एकत्र भेटतात, तेव्हा राजकीय चर्चा होतेच. तशी आमच्यातही झाली, असे सांगतानाच महापालिका निवडणुकीत एकत्र यायचे की, नाही याचा निर्णय राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच घेतील, असे सूचक विधान भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी यावेळी केले.

मुंबई बँकेची निवडणूक येऊन ठेपली आहे. यानिमित्ताने सहकार पॅनल स्थापन करण्यात आले आहे. या पॅनलमध्ये मनसेनेही सामील व्हावे म्हणून प्रसाद लाड यांनी बुधवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. लाड यांनी राज ठाकरे यांच्याशी दीर्घ चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही भेट होती. सर्व पक्षाच्या नेतृत्वाने सहकार पॅनलसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून बँकेची निवडणूक झाली पाहिजे हा सर्वांचा प्रयत्न होता. त्याबाबतीत राज यांच्याशी चर्चा केली. यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि त्यांचे फोनवर बोलणे करून दिले. दरेकर लवकरच राज ठाकरेंना भेटायला येतील. राज ठाकरे सहकार पॅनलसोबत येतील ही अपेक्षा आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मदत होईल, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंशी गाठीभेटी वाढल्या आहेत. महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चिन्हे तर नाहीत ना?, असा सवाल लाड यांना करण्यात आला. त्यावर लाड म्हणाले की, राजकीय उद्दिष्टाने बघितले तर सर्वच बाबतीत बघता येईल. मी नेहमी राज ठाकरेंना भेटतो. भेटल्यावर राजकीय चर्चा नक्कीच होते. पण जो काही निर्णय आहे. तो देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंचा आहे. मी फक्त जिल्हा बँकेच्या संदर्भात त्यांना भेटलो. त्याबाबतच मी सांगू शकतो. पुढचे सांगू शकत नाही, असे सूचक विधान त्यांनी केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …