मल्याळम दिग्दर्शक अली अकबरांनी सोडला इस्लाम धर्म

तिरुअनंतपूरम – मल्याळम दिग्दर्शक अली अकबर यांनी इस्लाम धर्म सोडण्याचा निश्चय केला आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्या निधनानंतर काही इस्लामवाद्यांकडून आनंद साजरा करण्यात आला. याच्या निषेधार्थ अली अकबर यांनी इस्लाम धर्माचा त्याग केला आहे. जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातात निधनाच्या पोस्ट आणि कमेंटच्या खाली अनेक इस्लामवाद्यांनी ‘स्मायली इमोजी’ (हसण्याचे चिन्ह) वापरल्याच्या कथित घटनांनंतर अकबर यांनी इस्लाम धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.

दिग्दर्शक अली अकबर यांनी यापूर्वी सीडीएस बिपीन रावत यांच्या मृत्यूची खिल्ली उडवणाऱ्या इस्लामवाद्यांवर टीका करणारा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता. व्हिडीओवर आक्षेपार्ह कमेंटमुळे अकबर यांचे खाते एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर अली अकबर यांनी दुसरे खाते उघडून त्यावर इस्लाम सोडत असल्याचे जाहीर केले. अकबर म्हणाले, ज्यांनी इमोजी टाकल्या त्यांच्या विरोधात बोलल्यानंतर पाच मिनिटांतच खाते ब्लॉक करण्यात आले. अकबर पुढे म्हणाले की, मोठ्या इस्लामिक नेत्यांनीही शूर लष्करी अधिकाऱ्यांचा अपमान करणाऱ्या ‘देशद्रोही’ अशा कृतींना विरोध केला नाही आणि हे आपण स्वीकारू शकत नाही. आपला धर्मावरील विश्वास उडाला आहे. ते पुढे म्हणतात, आजपासून मी मुस्लीम नाही. मी भारतीय आहे. भारताविरुद्ध हजारो हसतमुख इमोजी पोस्ट करणाऱ्या लोकांना हेच माझे उत्तर आहे. दुसरीकडे, या पोस्टवर फेसबुकवरील मुस्लीम समाजाकडून तीव्र टीका झाली आणि काहींनी अपमानास्पद भाषादेखील वापरली. दरम्यान, अनेक युझर्सने अकबर यांना पाठिंबा दिला आणि अकबर यांना शिवीगाळ करणाऱ्या नेटकऱ्यांना फटकारले. ही पोस्ट नंतर फेसबुकवरून काढून टाकण्यात आली असली, तरी ती व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत अकबर म्हणाले, सोशल मीडियावर अनेक देशविरोधी कारवाया होतात आणि रावत यांच्या मृत्यूवर हसणे हे त्याचे ताजे उदाहरण आहे. हसत इमोटिकॉनसह कमेंट करणारे आणि रावत यांच्या मृत्यूची बातमी साजरी करणारे बहुसंख्य वापरकर्ते मुस्लीम होते. त्यांनी हे केले, कारण रावत यांनी काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि अतिरेक्यांविरुद्ध अनेक कारवाया केल्या होत्या. एका धाडसी अधिकाऱ्याचा आणि देशाचा अपमान करणाऱ्या या सार्वजनिक पोस्ट्स पाहिल्या तरी, एकाही मोठ्या मुस्लीम नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही. मी अशा धर्माचा भाग होऊ शकत नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …