ठळक बातम्या

मलिकांना पुन्हा धमकीचे पत्र; समीर वानखेडेंची माफी मागितली नाही तर…

मुंबई – अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना पुन्हा एकदा धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याच्या धमकीसह कुटुंबातील महिलांवर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचे पत्र लिहिणाऱ्याने स्वत:ला नौदलात कर्नल असल्याचे सांगितले आहे. मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप केल्याने आपण पत्र लिहित असल्याचा उल्लेख देखील या पत्रात करण्यात आला आहे.

हे पत्र अभिजीत बनसोडे नावाच्या व्यक्तीने कफ परेड मुंबई येथून लिहिले असल्याचे मलिक म्हणाले. ते पुढे म्हणाले की, समीर वानखेडे यांची माफी मागितली नाही, तर मलिक यांच्या घरावर हल्ला करणार असल्याचा इशारा या पत्रातून दिला गेला आहे. या संपूर्णप्रकरणी आपण गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पत्र लिहून या पत्राची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, आपण अशा धमक्यांना घाबरत नाही. मागे देखील अशाप्रकारच्या धमक्या मला फोनवरून आल्या होत्या, परंतु यातील एकाही धमकीला आपण घाबरलेलो नाही आणि घाबरणार नाही. दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात नवाब मलिक यांना एका निनावी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. राजस्थानमधून हा फोन आल्याचे मलिक यांनी म्हटले होते. समीर वानखेडे चांगले काम करत आहेत. त्यांच्या कामात अडथळा आणू नका, अशी धमकी मलिक यांना देण्यात आली होती. या धमकीनंतर मलिक यांनी पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली होती.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …