मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सोमवारी थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नीरज गुंडे ड्रग्ज व्यवसायिक असून, तो फडणवीस सरकारच्या काळात वाद झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दूत बनून उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचा, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
नवाब मलिक म्हणाले, फडणवीस सरकारच्या काळात नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांचा दूत म्हणून उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचा. सरकार सुरू असताना फडणवीस आणि ठाकरेंचे नाते बिघडत होते. त्यावेळी नीरज गुंडे फडणवीसांचे निरोप घेऊन उद्धव ठाकरेंकडे मांडवली करण्यासाठी जायचा. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असतानाही गुंडे भाजप आणि शिवसेना सोबत यावी यासाठी प्रयत्न करत होता. गुंडेचा उद्धव ठाकरेंशी काहीही संबंध नाही. ते पुढे म्हणाले, हे प्रकरण महाराष्ट्रातील मोठ्या ड्रग्ज व्यवसायाचे आहे. देवेंद्र फडणवीस यांचा एक वजीर याच शहरात राहतो. त्याचे नाव नीरज गुंडे असे आहे. फडणवीस सरकारच्या काळात त्याला मुख्यमंत्री निवास, मुख्यमंत्री कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश होता. सर्व पोलिसांच्या बदल्या तो ठरवत होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यादेखील तोच ठरवायचा. महाराष्ट्रात त्याच्याच माध्यमातून वसुली केली जायची. दरम्यान, नवाब मलिक यांनी फडणवीस सरकार यांच्या काळातील बदल्यांवरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस नवी मुंबई किंवा पुण्याला जायचे, तेव्हा सायंकाळी त्याच्या घरी हजेरी लावायचे. फडणवीस सातत्याने नीरज गुंडेच्या घरी बसायचे. तिथूनच देवेंद्र फडणवीसांचे मायाजाल चालायचे. सरकार बदलल्यानंतर महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, आयकर किंवा एनसीबी अशा सर्व केंद्रीय तपास संस्थांच्या कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांचा वाझे फिरताना दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कोट्यवधी रुपये वसूल केले जात होते.