जालना – मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच चर्चा करणार असल्याचे देखील राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या नातेवाईकांना १० लाखांचे अर्थसहाय्य केले होते.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात अनेक तरुणांनी बलिदान दिले होते. त्यांच्या वारसांना नोकरीदेखील मिळणे गरजेचे असल्याचे राजेश टोपे म्हणाले. वारसांना फक्त महामंडळात नोकरी न देता गुणवत्तेच्या आधारावर योग्य नोकरी देण्यात यावी. म्हणजेच शैक्षणिक पात्रतेनुसार एक तर एमएसआरटीसी किंवा ते उच्च शिक्षित असतील तर वेगळ्या मार्गने इतर पदावर त्यांना नोकरी देणयासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नोकरी देण्याच्या कारवाई लवकर केली जाईल असे राजेश टोपे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारने नोव्हेंबर महिन्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्या मराठा युवकांना मदत करण्यात आली त्यांची यादी ट्विटरवरून शेअर केली होती. सतत पाठपुरावा केल्याने मराठा समाजातील ३४ युवकांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये मदत देण्यात आल्याचे ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते. शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या ३४ कुटुंबीयांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६, जालना ३, बीड ११, उस्मानाबाद २, नांदेड २, लातूर ४, पुणे ३, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे.