ममतादीदींची ‘ दीदीगिरी’ कायम : कोलकाता महापालिकेत ‘तृणमूल’ चा दणदणीत विजय

कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेस पक्ष अर्थात टीएमसीचे वर्चस्व कायम असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखवून दिले आहे. कोलकाता महानगरपालिका निवडणुकीत टीएमसीने १४४ पैकी १३४ जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत टीएमसीने भाजपचा सुपडा साफ करीत निर्विवाद विजय मिळवला आहे. रविवारी (१९ डिसेंबर) कोलकाता महानगरपालिकेसाठी मतदान झाले होते. मतमोजणीसाठी एकूण १६ केंद्रे तयार करण्यात आली होती. कोणताही हिंसाचार घडू नये म्हणून मतमोजणी केंद्राच्या २०० मीटर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले होते. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना केंद्राभोवती येण्यास मज्जाव करण्यात आला होता.
कोलकाता महानगरपालिकेतील १४४ जागांसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मंगळवारी मोजणी झाली. यात टीएमसीच्या खात्यात १३४ जागा गेल्या आहेत, तर भाजपच्या खात्यात अवघ्या तीन आणि काँग्रेस, डाव्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन जागा गेल्या आहेत. तीन जागांवर अपक्षांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या टीएमसीला ७१.९५ टक्के मते मिळाली आहेत, तर भाजपला फक्त ०८.९४ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसला ०४.४७ टक्के आणि डाव्यांना ११ टक्के मते मिळाली आहेत.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून कोलकात्यातील मतदारांचे आभार मानले आहेत. निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचेही त्यांनी अभिनंदन केले आहे. कठोर परिश्रम आणि कृ तज्ञतेने जनतेची सेवा करा असा सल्ला त्यांनी विजयी उमेदवारांनी दिला आहे. आमच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल कोलकात्यातील नागरिकांचे मनापासून आभार मानते, असे ममता बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
या निकालावर टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनीही ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. बंगालमध्ये द्वेष आणि हिंसेच्या राजकारणाला थारा नसल्याचे कोलकात्याच्या जनतेने दाखवून दिले आहे. इतका मोठा कौल दिला. आम्हाला आशीर्वाद दिला. त्याबद्दल मी कोलकात्याच्या जनतेचा आभारी आहे, असे ट्विट अभिषेक बॅनर्जी यांनी केले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …