ठळक बातम्या

मनसे पुन्हा सज्ज; राज ठाकरे करणार महाराष्ट्र दौरा

  •  शिवतीर्थवर पार पडली बैठक
  •  भाजप-मनसे युतीवर चर्चा

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे)चे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले आहेत. राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी शुक्रवारी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षांतर्गत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

राज ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन देसाईंसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात या बैठकीत रणनीती आखली गेली. त्यानुसार महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये राज ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला. यापैकी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यांच्या तारखा निश्चित झाल्याची माहिती, बाळा नांदगावकर यांनी दिली. नांदगावकर पुढे म्हणाले की, १४ डिसेंबर रोजी राज ठाकरे औरंगाबाद येथे येतील. अर्थात कोविड संबंधी सर्व नियमांचे पालन करत, जेवढ्या कार्यकर्त्यांची परवानगी मिळेल, तेवढ्याच संख्येने कार्यकर्ते व नेते या बैठकीला उपस्थित राहतील, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली. सकाळी दहा वाजता औरंगाबादमधील प्रमुख नेते, माजी नगरसेवक, सध्याचे नगरसेवक यांच्याशी पालिका निवडणुकांसदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होईल. त्यानंतर संध्याकाळी राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी पुणे येथे पोहोचतील. त्यानंतर कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही राज ठाकरे जातील, मात्र या दौऱ्यांच्या तारखा अद्याप निश्चित झाल्या नसल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.

  • भाजप-मनसे युती होणार?, नांदगावकर म्हणतात…

आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजपची युती होणार का?, या प्रश्नावर बाळा नांदगावकर म्हणाले, एकला चलो यामधून आम्ही निवडणुका लढवल्या आहेत, मात्र तूर्तास तरी भाजपसोबतच्या युतीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. दरम्यान, नांदगावकर यांनी ही प्रतिक्रिया दिल्यानंतर ‘तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल’ असे विधान केले. त्यामुळे युती होण्याचे हे संकेत आहेत का?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दुसरीकडे, मनसेच्या पहिल्या फळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक संदीप देशपांडे म्हणाले की, आगामी निवडणुकांत भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाली, मात्र स्वबळावर निवडणुका लढवाव्यात, अशी पदाधिकाऱ्यांची भावना होती. सर्व ठिकाणी पक्षाची परिस्थिती चांगली आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …