मध्य रेल्वेवर ८० नव्या फेऱ्या वाढण्याची शक्यता

…तर हार्बरवरील एसी लोकल गुंडाळल्या जाणार?

ठाणे – ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून किमान ८० नव्या फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. यातील काही फेऱ्या वातानुकूलित असणार आहेत. या मार्गावरील लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाढीव फेऱ्यांमुळे या मार्गावरील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
रविवार १९ डिसेंबर रोजी ठाणे ते दिवा मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी १८ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. हा मार्ग तयार करण्यासाठी आणखी पाच ते सहा मेगाब्लॉकची गरज असल्याचे मध्य रेल्वेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या मार्गाच्या कामासाठी पुढचा ब्लॉक नवीन वर्षात २ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. हा मार्ग एकदा तयार झाला की, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लांब पल्ल्याच्या काही गाड्या या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे इतर मार्गावरील भार काही प्रमाणात हलका होण्यास मदत होईल.

हार्बर मार्गावरील एसी लोकलचा फेरआढावा घेणार
मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावर एसी लोकलच्या सध्या १६ फेऱ्या, मुख्य मार्गावर १० आणि हार्बर मार्गावर १२ अशा एकूण एसी लोकलच्या ३८ फेऱ्या चालवण्यात येत आहेत, परंतु ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गावर प्रवाशांचा खूपच कमी प्रतिसाद आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या मार्गावरील एसी लोकलचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. गरज भासल्यास यातील काही एसी लोकलच्या फेऱ्या रद्द करण्याचे नियोजन असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …