मणिपूरमध्ये लष्करी ताफ्यावर भ्याड हल्ला, ७ जण शहीद; कर्नलसह पत्नी, मुलाचा समावेश

इम्फाळ – मणिपूरमध्ये अतिरेक्यांनी शनिवारी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या एका भ्याड हल्ल्यात आसाम रायफल्सच्या एका बटालियनच्या ‘कमांडिंग ऑफिसर’सह (सीओ) ७ जण शहीद झाले आहेत. मृतांमध्ये सीओंच्या पत्नी व ८ वर्षीय मुलासह अन्य ४ जवानांचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे २०१५ नंतर प्रथमच मणिपूरच्या डोंगररांगांतील शांतता भंग पावली आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.
आसाम रायफल्सच्या खुगा बटालियनचे ‘सीओ’ कर्नल विप्लव त्रिपाठी शनिवारी सकाळी एका सीमाचौकीच्या दौऱ्यावर गेले होते. तेथून परत येताना दबा धरून बसलेल्या ‘पीआरईपीएके’च्या संशयित अतिरेक्यांनी म्यानमार सीमेलगतच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील सेहकन गावाजवळ त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत त्रिपाठी, त्यांच्या पत्नी व ८ वर्षीय मुलासह अन्य ४ जवान असे एकूण ७ जण मारले गेले, तर उर्वरित जखमींवर बेहियांगा आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. त्रिपाठी यांची गत जुलै महिन्यातच मिझोराम येथून मणिपूरमध्ये बदली झाली होती. आसाम रायफल्सने त्यांच्या रूपाने एक धाडसी तरुण अधिकारी गमावल्याची भावना व्यक्त केली आहे.

———————————————————-
आसाम रायफल्सच्या ताफ्यावरील हल्ला अत्यंत दु:खद व निंदनीय आहे. देशाने ४६ व्या आसाम रायफल्सच्या सीओंसह ४ जवान व त्यांच्या कुटुंबातील २ सदस्य गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना. दोषींना लवकरच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल. – राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री

———————————————————-
अतिरेक्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. दरम्यान, अतिरेक्यांनी २०१५ मध्ये मणिपूरमध्ये केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने थेट म्यानमारच्या हद्दीत शिरून त्यांचा खात्मा केला होता. आताही अतिरेक्यांना शोधून कारवाई केली जाईल. – एन बीरेन सिंह, मुख्यमंत्री, मणिपूर

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …