मढ आयलंडमधील ८३० बंगल्यांचे बोगस नकाशे तयार करून कोट्यवधींचा घोटाळा – प्रवीण दरेकर

मुंबई – पश्चिम उपनगरातील मालाड येथील मढ आयलंड इथल्या ८३० बंगल्यांचे बोगस नकाशे तयार करून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. भूमी अभिलेख कार्यालय, मुंबई महानगरपालिका व धनदांडगे यांच्या भ्रष्ट साखळीने संगनमत करून हा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केला आहे. भूमी अभिलेख विभागाच्या १९६७ च्या मूळ नकाशांच्या बोगस प्रती तयार करून मढ आयलंड येथे नो-डेव्हलपमेंट झोन, सीआरझेड आणि एनए नियमांचे उल्लंघन करून दुरुस्तीच्या नावाखाली धनाढ्यांनी नवीन बांधकामे केली असल्याचे दरेकर म्हणाले. १०२ बंगल्यांची अनधिकृत बांधकामे झाली असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून घोटाळ्याला जबाबदार असलेले उप अधीक्षक, भूमी अभिलेख, अनधिकृत बंगल्यांना सोयीसुविधा देणारे मुंबई महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दरेकरांशी सहमती व्यक्त करून बोगस नकाशांच्या आधारे १०२ अनधिकृत बंगले बांधले गेल्याचे आपल्या उत्तरात कबूल केले आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची जमावबंदी आयुक्तांमार्फत एक महिन्याच्या आत चौकशी करून याप्रकरणी जे जबाबदार आहेत, त्या संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही महसूल मंत्री थोरात यांनी दिले आहे. प्रवीण दरेकर यांनी सोमवारी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून पश्चिम उपनगरातील मालाडमधील मढ आयलंड येथील कोट्यवधी रुपयांचे बोगस नकाशे आणि अनधिकृत बंगले बांधकामाच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. उच्चभ्रू, धनाढ्य लोक अनधिकृत बंगले बांधून चित्रीकरणासाठी हे बंगले भाड्याने देऊन यामधून कोट्यवधी रुपयांची कमाई करण्याचा धंदा सुरू आहे. १९६७ मध्ये सर्वेक्षण करून नकाशे तयार करण्यात आले होते. त्यापेक्षा वेगळे, बोगस नकाशे तयार करून नव्याने बांधकामे करण्यात आली. या घोटाळ्यात महानगरपालिका, भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व काही धन दांडगे गुंतल्याचा गंभीर आरोपही दरेकर यांनी केला आहे. या परिसरातील ८३० नकाशे बोगस असल्याचे उघड झाले असून, विभागाच्या अधिकृत मूळ अभिलेखात छेडछाड करून खोट्या नोंदी नोंदवून राज्य सरकार, तसेच उच्च न्यायालयाची व मूळ जमीनधारकांची सुनियोजित फसवणूक करण्यात आल्याचेही दरेकर यांनी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिले. या प्रकरणामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून तातडीने सखोल चौकशी करावी. तसेच संबंधित उपअधीक्षक, भूमिअभिलेख व पालिकेचे वॉर्ड ऑफिसरच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणीही दरेकर यांनी केली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …