मंत्रालयासमोर जनशक्ती संघटनेचे आत्मदहन आंदोलन

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा रविवारी सहावा दिवस होता. ५ दिवस उलटून गेल्यानंतरही सरकारकडून ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत मंत्रालयासमोर आत्मदहन आंदोलन केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला जनशक्ती संघटनेने पाठिंबा दिला आहे. जनशक्तीच्या जवळपास २० ते ३० कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहन आंदोलन केले. या आंदोलनात महिला कार्यकर्त्याही सामिल झाल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला.
सकाळी १०च्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण झालेच पाहिजे, एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणांनी मंत्रालय परिसर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली.
तीन ते चार महिला एसटी कर्मचाऱ्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच या आंदोलक महिलांना रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आमच्या न्याय हक्कांसाठी आम्ही गेले अनेक दिवस आझाद मैदानावर बसलोय. सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. आमचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची दैना झालीय. तुटपुंज्या पगारात कुटुंब कसे जगवायचे? याची भ्रांत पडलीय; पण सरकार आमचा आवाज ऐकायला तयार नाही, अशा भावना आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
मागील आठ दिवसांपासून आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. आता या कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांना देखील आझाद मैदानात आणून कुटुंबासह आंदोलनात सहभाग घेतला आहे. रविवारी कोल्हापूर विभागातील आंदोलक कर्मचाऱ्यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सत्यनारायण पूजा मांडून आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जागरण गोंधळ, भजन, किर्तन यानंतर आता सत्यनारायण पूजा घालत या कर्मचाऱ्यांनी हे लक्षवेधी आंदोलन केले. योग्य निर्णय घेण्याची सरकारला सुबुद्धी द्यावी यासाठी सत्यनारायण पूजा असल्याचे यावेळी आंदोलकांकडून सांगण्यात आले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …