मुंबई – मुंबईकरांची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल गाड्यांच्या देखभालीसाठी वाणगाव आणि भिवपुरी येथे दोन नव्या कारशेड उभारण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) घेतला आहे. त्यामुळे भविष्यात लोकल फेऱ्यात वाढ होऊन चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होऊ शकतो.
मध्य रेल्वेवर सध्या कुर्ला, कळवा आणि सानपाडा अशा तीन कारशेड आहेत. कुर्ला कारशेडमध्ये ४५ रेल्वेगाड्या, कळवा येथे ४० आणि सानपाडा येथे ३५ अशा एकूण १२० गाड्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची क्षमता आहे. मात्र गाड्यांच्या देखभालीसाठी अन्य सुविधा नसल्याने या तिन्ही कारशेडमध्येच १५० रेल्वे गाड्यांची देखभाल केली जाते. यामुळे नवीन कारशेडची गरज असल्याचा प्रस्ताव सन २०१९ मध्ये तयार करण्यात आला होता. नवीन कारशेड उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेवरील वाणगाव आणि मध्य रेल्वेवरील भिवपुरी या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. वाणगाव कारशेडसाठी ३५ हेक्टर आणि भिवपुरीसाठी ५५ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. भूसंपादनासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे, भिवपुरी येथे रेल्वेगाड्या उभ्या करण्यासाठी अतिरिक्त मार्गिका असणार आहेत. यामुळे या कारशेडसाठी अधिक जागेची गरज आहे. यामुळे वाणगावच्या तुलनेत भिवपुरी येथे जागेची आवश्यकता जास्त आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, कांदिवली आणि विरार या तीन कारशेडमध्ये क्षमतेपेक्षा अधिक लोकल गाड्यांची देखभाल दुरुस्ती होत आहे. यामुळे पश्चिम रेल्वेने देखील अतिरिक्त कारशेड उभारण्याची गरज असल्याची सूचना एमआरव्हीसीला केली होती. कारशेड उभ्या राहिल्याने परिसरातील अन्य जमिनींच्या किमतीत वाढ होणार आहे. यामुळे भूसंपादनाला स्थानिकांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …