मुंबई – मुंबई कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचेच वर्चस्व पाहायला मिळाले. मयांक अग्रवालच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव २७६ धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडपुढे ५४० धावांचे मोठे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करणारा न्यूझीलंडचा अर्धा संघ यावेळी गारद झाला आणि त्यांना १४० धावा करता आल्या. भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर असून, त्यांना चौथ्या दिवशी विजयासाठी पाच विकेट्सची गरज आहे. दुसऱ्या डावात अश्विनने तीन आणि अक्षर पटेलने एक बळी मिळवला आहे.
मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी तिसऱ्या दिवसाची चांगली सुरुवात केली. पहिल्या डावात दीडशतक झळकावणाऱ्या मयांक अग्रवालने यावेळी आपले अर्धशतकही पूर्ण केले. मयांकला यावेळी दुसऱ्या डावातही शतक झळकावण्याची चांगली संधी होती, पण त्याला अर्धशतकानंतर जास्त काळ खेळपट्टीवर तग धरता आले नाही. न्यूझीलंडच्या एजाज पटेलने दुसऱ्या डावातही मयांकला बाद केले. मयांकने यावेळी ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६२ धावांची खेळी साकारली. मयांक बाद झाल्यावर पुजारा अर्धशतकासमीप पोहोचला होता. बऱ्याच दिवसांनी पुजाराचे अर्धशतक पाहायला मिळणार, अशी चाहत्यांना आशा होती. पण यावेळीही अर्धशतक साकारण्यात पुजारा अपयशी ठरल्याचेच पाहायला मिळाले. पुजाराचे अर्धशतक यावेळी फक्त तीन धावांनी हुकले. एजाज पटेलनेच यावेळी पुजाराला बाद केले. पुजाराने सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४७ धावा केल्या. पुजारानंतर शुमबनलाही अर्धशतकाने हुलकावणी दिली. तो ४७ धावांवर माघारी फिरला. यावेळी कोहली मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पण कोहलीला यावेळी ३६ धावांवरच समाधान मानावे लागले. अक्षर पटेलने धडाकेबाज फटकेबाजी करत ४१ धावा केल्या आणि भारताने २७६ धावांवर आपला दुसरा डाव घोषित करत न्यूझीलंडपुढे ५४० धावांचे मोठे आव्हान ठेवले.
भारताच्या ५४० धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. टॉम लॅथम अवघ्या ६ धावांवर बाद झाला. आर अश्विनने ही विकेट घेतली आणि स्पायडर कॅमेरा मैदानावर अडकल्याने १५ मिनिटे आधीच टी ब्रेक घ्यावा लागला. टी ब्रेकनंतर आर अश्विनने किवींना आणखी दोन धक्के दिले. विल यंग (२०) व रॉस टेलर (६) यांना माघारी पाठवले त्यानंतर हेन्री निकोल्स व डॅरील मिचेल यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला सामना केला. मिचेलने वैयक्तिक अर्धशतकासह निकोल्सह अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांची ७३ धावांची भागीदारी अक्षर पटेलने तोडली. डॅरील मिचेलला ६० धावांवर तंबूत परतावे लागले. त्यानंतर आलेल्या टॉम ब्लंडलने घाई केली आणि त्यालाही भोपळ्यावर धावबाद होऊन माघारी जावे लागले. न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद १४० धावा केल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी दोन दिवसांत ४०० धावांची आवश्यकता आहे, तर भारताला मालिका खिशात घालण्यासाठी ५ विकेट्स हव्या आहेत.