भारतीय महिला खेळाडूंनी थायलंडचा १३-० ने उडवला धुव्वा

डोन्घा (दक्षिण कोरिया) – ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरच्या पाच गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी (५ डिसेंबर) आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात थायलंडचा १३-० असा दणदणीत पराभव केला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर भारतीय हॉकी संघ पहिल्यांदाच मैदानात उतरला. या सामन्यात सविता पुनिया संघाची कर्णधार होती.
गुरजीतने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रूपांतर केले, तर पाच मिनिटांनंतर वंदना कटारियाने दुसरा गोल नोंदवला. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस लिलिमा मिन्झने १४ व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल केला, तर गुरजीत आणि ज्योती यांनी १४व्या आणि १५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत स्कोअर ५-० असा केला. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय महिला हॉकी संघाने वर्चस्व कायम राखले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या राजविंदर कौरने १६ व्या मिनिटाला मैदानी गोल केला, तर गुरजीतने २४ व्या मिनिटाला वैयक्तिक तिसरा गोल केला. काही वेळातच लिलिमाने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले.
गुरजीतने २५व्या मिनिटाला आणखी एक गोल करून हाफ टाईमपर्यंत भारताची आघाडी ९-० अशी भरभक्कम केली. भारताने थायलंडला त्यानंतर एकही संधी दिली नाही आणि वारंवार थायलंडच्या गोलपोस्टवर हल्ले चालू ठेवले. ज्योतीने ३६व्या मिनिटाला गोल करत भारताची गोलसंख्या दुहेरी अंकात नेली, त्यानंतर सोनिकाने ४३ व्या मिनिटाला सामन्यातील तिचा पहिला गोल केला. चौथ्या क्वार्टरमध्येही सामन्याचे चित्र बदलेल असे वाटत होते, पण भारतीय महिला संघाने आक्रमण सुरूच ठेवले. थायलंडने यावेळी चांगला बचाव केला. मोनिकाने ५५व्या मिनिटाला गोल केला, तर गुरजीतने तीन मिनिटांनंतर पेनल्टी कॉर्नरवर वैयक्तिक पाचवा आणि भारतासाठी एकूण १३ वा गोल केला.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …