ठळक बातम्या

भारताविरुद्ध एका डावात १० विकेट घेणाऱ्या एजाजला न्यूझीलंडने वगळले

मुंबई – डिसेंबर महिन्यात मुंबईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने इतिहास रचला होता. त्याने एका डावात भारताच्या १० विकेट घेतल्या होत्या. इतकी अव्वल दर्जाची कामगिरी करूनही, न्यूझीलंडने आता मायदेशात होणाऱ्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातून एजाज पटेलला डच्चू दिला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात १० विकेट घेणारा एजाज पटेल हा तिसरा क्रिकेटपटू आहे. त्याने दोन्ही डावात ६७ षटके गोलंदाजी करून एकूण १४ विकेट घेतल्या होत्या.
राचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल या दोन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे, त्यामुळे एजाजला जागा मिळाली नाही. भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेत अष्टपैलू राचिन रवींद्रनेही लक्ष वेधून घेतले होते. आता १३ सदस्यीय संघात राचिन रवींद्रच्या रूपाने न्यूझीलंडकडे फिरकीचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. न्यूझीलंडमध्ये ही कसोटी मालिका होणार आहे. केन विलियमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करणार आहे. टी-२० वर्ल्डकपच्या सामन्यादरम्यान केनच्या दुखापतीने उचल खाल्ली होती. त्यामुळे त्याला भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळता आले नाही. दुखापतीमुळे केन दीर्घकाळासाठी संघाबाहेर राहू शकतो, त्याच्यावर शस्त्रक्रियाही होऊ शकते, असे न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टेड यांनी म्हटले होते.

दुसऱ्या कसोटीत १० विकेट घेणाऱ्या एजाज पटेलचे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडात कौतुक केले होते. कर्णधार विराट कोहली, हेड कोच राहुल द्रविड यांनीही न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन एजाजचे कौतुक केले होते. न्यूझीलंडच्या कसोटी संघातील फिरकीपटू एजाज पटेलचा जन्म १९८८ साली मुंबईत झाला. १९९६ मध्ये एजाजचे संपूर्ण कुटुंब न्यूझीलंडला स्थायिक झाले. यादरम्यान २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या एजाजने आतापर्यंतच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट कामगिरी मुंबईच्या मैदानावर भारताविरुद्ध केली होती.
त्याला संघात स्थान न मिळाल्याने न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी प्रतिक्रिया दिली असून, ऐतिहासिक स्पेल टाकून बाहेर पडणे दुर्दैवी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. भारतात एजाजच्या रेकॉर्डब्रेक प्रदर्शनानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल वाईट वाटणे साहजिकच आहे. आम्ही सर्वश्रेष्ठ संघनिवडीवर भर दिला आहे. आम्ही बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर ज्या पद्धतीने खेळाडू निवडले ते उत्तम प्रकारे खेळी करतील असा विश्वास आहे, असे स्टेड यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …

One comment