भारताला दक्षिण आफ्रि केला हरवण्याची नामी संधी – शास्त्री

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींच्या मते दक्षिण आफ्रिका संघाला त्यांच्याच धरतीवर हरवणे आजवर सोपे गेले नसले, तरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ रविवार (२६ डिसेंबर) पासून सुरू होत असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये विजय मिळविण्यास सक्षम आहे. रवी शास्त्री म्हणाले की ते कायम भारतीय टीमचे समर्थन करीत राहतील. शास्त्रींनी आगामी मालिकेबद्दल एका क्रीडाविषयक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की भारतीय टीमकडे आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. दक्षिण आफ्रि केला त्यांच्याच भूमीत हरविण्याची नामी संधी टीम इंडियाला असल्याचे ते म्हणाले. विराट कोहली उत्तम कर्णधार असून त्याच्याकडे प्रतिभावान टीम आहे. दक्षिण आफ्रि केत भारताला आजवर मालिका जिंकता आलेली नाही, परंतु आपल्याकडे पुरेशी साधने आहेत हे ध्यानात घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नेहमीप्रमाणेच आपले टीम इंडियाला समर्थन असेल, असा पुनरूच्चार रवी शास्त्री यांनी केला. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ यांच्यातील पहिली कसोटी सेंच्युरियन येथील सुपर स्पोर्ट पार्क मध्ये खेळली जाणार आहे. दुसरी आणि तिसरी कसोटी अनुक्रमे जोहान्सबर्ग आणि केपटाऊनमध्ये खेळली जाईल. त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल. भारताने १९९२ मध्ये डर्बन येथे दक्षिण आफ्रिके विरोधातील आपला पहिला कसोटी सामना खेळला होता, तर अलीकडेच शास्त्रींच्या जागी मुख्य प्रशिक्षक पद सांभाळणाऱ्या राहुल द्रविडच्या नेतृत्वात टीम इंडियाने २००६ मध्ये तेथे आपली पहिली कसोटी जिंकली होती.
रवी शास्त्री दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्धच्या आगामी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत समालोचन करताना दिसतील. रवी शास्त्रींनी ७ वर्षे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी रवी शास्त्री एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ओळखले जायचे. नोव्हेंबरमध्ये टी-२० वर्ल्डकप संपल्यानंतर रवी शास्त्रींचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या रूपातील कार्यकाळ संपला होता.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …