ठळक बातम्या

भारताने ‘सेंच्युरियन’ वर रचला इतिहास!

आफ्रिकेला ११३ धावांनी चारली धूळ

सेंच्युरियन – आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी मोठा विजय मिळवत भारतीय संघाने इतिहास रचला आहे. सेंच्युरियनच्या मैदानावर आफ्रिकेला कसोटी सामन्यात पराभूत करणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला. ३०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारताने १९१ धावांतच गुंडाळले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. शतकासह दोन्ही डावांत मिळून १५६ धावा काढणारा भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल सामनावीर ठरला. तर भारताने २०२१ ची सुरुवात ऑस्ट्रेलियात विजयाने केली होती आणि आफ्रिकेतच त्यांचा पराभव करुन २०२१ ची सांगता केली आहे.
चौथ्या दिवशी शेवटच्या सत्रात आफ्रिकेने मार्कराम (१), पीटरसन (१७), डुसेन (११) आणि महाराज (८) हे चार गडी गमावले होते. कसोटीचा पाचवा आणि अखेरचा दिवस असल्यामुळे सर्वांचे लक्ष कसोटीकडे लागून राहिले होते. पाचव्या दिवशी सुरुवातीच्या अर्ध्या तासात कर्णधार डीन एल्गर आणि टेंबा बावुमाने संयमी खेळ केला. एल्गर खेळपट्टीवर असेपर्यंत भारताच्या विजयाबद्दल थोडी धाकधूक वाटत होती. मात्र एल्गर ७७ धावांवर असताना जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला क्विंटन डिकॉक जास्त काळ मैदानात तग धरू शकला नाही. क्विंटन डिकॉक २१ धावा करून तंबूत परतला. मोहम्मद सिराजने त्याचा त्रिफळा उडवला. वियान मल्डर क्विंटन पाठोपाठ बाद झाला. मल्डरने ३ चेंडूंत अवघी एक धाव केली. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला. लगेचच मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मार्को जॅनसेन १३ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कागिसो रबाडाला आपले खातेही खोलता आले नाही. अवघ्या ४ धावा करून आर. अश्विनच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीने त्याचा झेल घेतला. त्यानंतर लुंगी एनगिडी दुसऱ्या चेंडूवर बाद झाला आणि भारताने विजय साकारला. दुसऱ्या डावात बुमराह-शामीने प्रत्येकी तीन तर सिराज-अश्विनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात भारताने सर्वबाद ३२७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने १९७ धावा केल्या. त्यामुळे भारताला १३० धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात भारताने सर्वबाद १७४ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३०४ धावांचे आव्हान दिले. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वबाद १९१ धावा करू शकला.
कसोटी विजयाचे तीन हिरो
भारताच्या या पहिल्या कसोटी विजयाचे तीन हिरो ठरले आहेत. केएल राहुल, मयांक अग्रवाल आणि मोहम्मद शामी या तिघांनी पहिल्या डावात केलेली कामगिरी निर्णायक ठरली. केएल राहुलने उपकर्णधारपदाला साजेशी खेळी साकारली. त्याने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. मयांकने अर्धशतक झळकावून त्याला चांगली साथ दिली. दोघांनी पहिल्या डावात ११७ धावांची सलामी देऊन मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. अन्य फलंदाजांना त्यावर कळस चढवता आला नाही. पण या दोन फलंदाजांनुळे भारताला ३०० धावांची वेस ओलांडता आली. ३२७ धावांवर पहिला डाव संपुष्टात आल्यानंतर गोलंदाजांनी भूमिका महत्त्वाची होती. मोहम्मद शामीने गोलंदाजीचा भार समर्थपणे संभाळला. त्याने पहिल्या डावात १६ षटकात ४४ धावा देत आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याने सलामीवीर मार्करम, बावुमा हे महत्त्वाचे विकेट घेतले. दुसऱ्या डावातही शामीने भेदक मारा कायम ठेवला. त्याने आणि बुमराहने मिळून प्रत्येकी तीन विकेट घेतले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …