
भारतीयांसाठी हे आव्हान
लसीकरण अत्यावश्यक
नवी दिल्ली – जगभरात सध्या थैमान घातलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हॅरिएंटचे रुग्ण आता भारतातही आढळले आहेत, पण देशात आढळलेल्या एका रुग्णाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसतानाही त्याला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच ओमिक्रॉन हा परदेशातून भारतात येण्याआधीपासूनच मोठ्या शहरांमध्ये अस्तित्वात होता, असे मत सीएसआयआर-सीसीएमबीचे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी व्यक्त केले आहे.
ओमिक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असला, तरी त्याची लक्षणे अगदीच सौम्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ओमिक्रॉन हा विषाणू सर्वांत प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. तिथून तो इतर देशांमध्ये पसरल्याचे सांगितले जात आहे. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी ही हैदराबादमधली एक संशोधन संस्था आहे. भारत सरकारच्या सीएसआयआर या संस्थेंतर्गत ही संस्था काम करते. गुरुवारी (२ डिसेंबर) कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यातल्या ४६ वर्षांच्या रुग्णाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती. याचाच अर्थ देशात ओमिक्रॉन बाहेरून नाही आला, तर तो आधीपासूनच येथे आहे. कदाचित आपल्याला जे रुग्ण सापडले आहेत, त्याव्यतिरिक्त देशातल्या आणखी मोठ्या शहरांमध्येही हा विषाणू उपस्थित असावा, असे डॉ. मिश्रा म्हणाले. यामुळे आता देशभरात मोठ्या स्तरावर मॉनिटरिंग आणि जीनोम सिक्वेन्सिंग करण्याची गरज आहे; पण यात चांगली गोष्ट ही आहे, की ओमिक्रॉन देशात उपस्थित असूनही रुग्णालयांमध्ये भरती होण्याचे किंवा मृत्यूचे प्रमाण त्यामुळे वाढलेले दिसत नाहीये, असेही ते म्हणाले.
ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळणे हा खरंतर भारतीयांसाठी वेक-अप कॉल असल्याचे डॉ. मिश्रा यांनी म्हटले आहे. दुसरी लाट ओसरल्यामुळे किंवा लसीकरण झाल्यामुळे भारतीयांनी पुन्हा निष्काळजीपणा करण्यास सुरुवात केली होती. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा देशातले नागरिक कोरोनाविरुद्धची योग्य ती खबरदारी बाळगण्यास सुरुवात करतील. आतापर्यंत समोर आलेल्या अभ्यासांनुसार, खरंच याची लक्षणे सौम्य असतील, तर हा व्हेरिएंट आपल्यासाठी वरदान ठरू शकतो, असे डॉ. मिश्रा म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशी जी खबरदारी बाळगत होतो, ती कायम ठेवण्याची गरज आहे. तसेच देशात मोठ्या स्तरावर आणि जलद गतीने जीनोम सीक्वेन्सिंग करण्याची गरज आहे, असे मिश्रा यावेळी म्हणाले. देशातल्या लसीकरण मोहिमेमुळेच आज आपण कोरोनाला चांगल्या रीतीने थोपवले असल्याचेही ते म्हणाले. लसीकरण हे एका हेल्मेटप्रमाणे काम करते. जसे हेल्मेटमुळे अपघात होणे टळत नाही, तसेच लसीकरणामुळे कोरोनाची लागण होणे टळत नाही; पण हेल्मेट अपघातात आपले प्राण वाचवू शकते, तसेच लसीकरण कोरोनापासून आपले रक्षण करते, असे मिश्रा यांनी यावेळी स्पष्ट केले. लस घ्यावी की नाही हा वादाचा मुद्दा असूच शकत नाही. लस घेणे हे सर्वांसाठी अनिवार्य असावे. कोणी लसीकरणाला विरोध करत असेल, तर ती व्यक्ती विषाणूला पाठिंबा दर्शवत आहे, म्हणजेच नागरिकांच्या विरोधात आहे असे समजले जावे, असे ते पुढे म्हणाले.
देशातल्या सध्याच्या परिस्थितीबाबत बोलताना डॉ. मिश्रा म्हणाले की, सेरो पॉझिटिव्हिटी रेट उच्च आहे, तसेच निम्म्याहून अधिक जनतेचे पूर्ण लसीकरण झाले आहे. सुमारे ८० टक्के प्रौढांनी पहिला डोस घेतला आहे. पहिल्या लाटेमध्ये कोरोनाची लागण होऊन त्यातून बरे झालेल्यांची संख्याही मोठी आहे. या सगळ्या कारणांमुळे ओमिक्रॉनला तोंड देण्यासाठी आपण खरंतर सज्ज आहोत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीवर नीट लक्ष ठेवले आणि लसीकरणाचा वेग कायम ठेवला, तर आपण ओमिक्रॉनवर सहज मात करू शकतो.