.२९ देशांत ३७३ रुग्ण
मुंबई – जगभरात कोरोनाबाबत नव्याने धास्ती निर्माण करणारा ओमिक्रॉन व्हेरिएंट अद्याप भारतापासून दूर असल्यामुळे देशातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता; मात्र भारतीयांची ही निश्चिंतता अल्पजीवी ठरली आहे, कारण भारतात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना लव अग्रवाल यांनी कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याचं सांगितलं असून, आतापर्यंत एकूण २९ देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याचं देखील सांगितलं. त्यामुळे ओमिक्रॉन आता हळूहळू हातपाय पसरायला लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे.
अवघ्या दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत बोलताना देशात एकही ओमिक्रॉनचा रुग्ण नसल्याची माहिती दिली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि आफ्रिकेतील इतर काही देशांमध्ये आढळलेला हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट भारतापासून अद्याप दूर असल्याचा दिलासा देशवासीयांना मिळाला होता; मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकमध्ये दोन रुग्णांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळल्याची माहिती दिली आहे. आतापर्यंत २९ देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले एकूण ३७३ रुग्ण सापडल्याचं देखील आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दक्षिण आफ्रिकेतून नुकत्याच डोंबिवलीत परतलेली एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली होती. दक्षिण आफ्रिकेतच ओमिक्रॉनचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं होतं. हा रुग्ण ओमिक्रॉनचाच आहे की, कोरोनाच्या इतर व्हेरिएंटचा, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नसून, या व्यक्तीच्या चाचणीचे नमुने जेनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.