भारतातील पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याचा ८८वा वर्धापनदिन

दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, सुनील शेट्टी हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
१५ ते १९ डिसेंबर, १९३३ दरम्यान बॉम्बे जिमखान्यावर खेळवला गेला होता सामना

मुंबई – मुंबईतील एक ऐतिहासिक मैदान असेलल्या बॉम्बे जिमखान्यावर भारतातील पहिला कसोटी क्रिकेट सामना १५ ते १९ डिसेंबर, १९३३ रोजी खेळवला गेला होता. या ऐतिहासिक घटनेला ८८ वर्षे झाली असून, त्याचा उत्सव बॉम्बे जिमखान्यातर्फे यंदा साजरा केला जात आहे. या जिमखान्याच्या मातीचे पूजन आणि तिचे संवर्धन करत या मैदानाला अभिवादन केले जाणार असून, त्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन १५ डिसेंबर, २०२१ रोजी सायंकाळी करण्यात आले. या कार्यक्रमाला भारताचे माजी क्रिकेट कर्णधार दिलीप वेंगसरकर, माजी क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी, बॉम्बे जिमखानाचे अध्यक्ष आगा हुसेन हे मान्यवर उपस्थित होते. स्पोटर््स मार्केटिंग गुरू शैलेंद्र सिंग आणि आगामी ८३ या चित्रपटात वेंगसरकर यांची भूमिका साकारणारे अभिनेता आदिनाथ कोठारे हे मान्यवर उपस्थित होते.
भारतात जो पहिला क्रिकेट कसोटी सामना खेळवला गेला तो १५ ते १९ डिसेंबर १९३३ दरम्यान बॉम्बे जिमखाना येथे खेळविला गेला होता. या सामन्यातील पहिला चेंडू मोरीस निकोलस यांनी टाकला होता. पाच दिवस चाललेला हा सामना पाहण्यासाठी तब्बल ५० हजार लोक आल्याची नोंद आहे. प्रख्यात क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांनी त्यांचे पहिले शतक याच सामन्यात केले होते. त्यांच्यावर फिदा होऊन प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेल्या कित्येक महिलांनी त्यांचे दागिने अमरनाथ यांच्यावर उधळल्याची नोंद इतिहासात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून हा सामना पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी या मैदानावर आले होते. दुर्दैवाने हा सामना भारताने गमावला होता.

दिलीप वेंगसरकर म्हणाले, बॉम्बे जिमखान्याचे मैदान हे मुंबईतील सर्वोत्तम अशा मैदानांपैकी एक आहे. ते क्रिकेटचे दिवस इथे फिरून आले पाहिजेत. माझ्या आवडत्या मैदानांपैकी हे एक मैदान आहे. मला आठवते मन्सूर आली खान पतौडी यांच्याविरोधात एक सामना खेळत असताना, श्याम सावंत नावाच्या आमच्या एका बॉलरला त्याने पायाजवळ चेंडू टाकायला सांगितले, पण पतौडी यांनी तो अगदी कौशल्याने मिड आॅनला टोलवला. आमची फजिती झाली. मी इथे बरेच महाविद्यालयीन सामने खेळलो आहे. हजारो प्रेक्षक त्यावेळीही सामना पाहायला येत असत.
रवी शास्त्री म्हणाले, या कार्यक्रमाचे आयोजन बॉम्बे जिमखान्याने केले याचा मला अतिशय आनंद आहे. भारतात जो पहिला कसोटी सामना खेळवला गेला त्याचा आज ८८ वा वर्धापनदिन आहे. असे कार्यक्रम आयोजित करणे खूप गरजेचे आहेत, कारण लोक आपले सुवर्णक्षणसुद्धा लवकर विसरतात. या सुवर्ण क्षणांसाठी बॉम्बे जिमखाना क्रिकेटप्रेमींच्या नेहमीच लक्षात राहील. हा पहिला सामना इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे.

भारतीय क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासातील या सोनेरी क्षणांना आता ८८ वर्षे पूर्ण झाली आहेत. बॉम्बे जिमखाना व्यवस्थापनाने हा सुवर्णक्षण साजरा करण्याचे ठरवले आणि त्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी केले. दरवर्षी अशाप्रकारचे आयोजन करण्याचे व्यवस्थापनाने ठरवले आहे. जिमखाना व्यवस्थापनातर्फे संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत. या संपूर्ण मोहिमेची संकल्पना आणि नेतृत्त्व ‘स्पोटर््स मार्केटिंग गुरू’ शैलेंद्र सिंग यांच्याकडे आहे.
हा उत्सव भारतीय क्रिकेटच्या स्पिरीटचा उत्सव असून, त्या माध्यमातून क्रिकेटपटूंच्या युवापिढ्यांना प्रेरणा मिळणार आहे. हा केवळ जिमखाना आणि सदस्यांसाठीच नाही, तर क्रिकेट जगत आणि प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा क्षण आहे. सर्वच भारतीय, आयसीसी, बीसीसीआय आणि एक अब्जहून अधिक क्रिकेटप्रेमी या मातीचा व पवित्र क्रिकेट मैदानाचा हा गौरव साजरा करतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे उद्गार सिंग यांनी काढले.

क्रिकेट जगतातील या जगद्विख्यात खेळाडूंबरोबर आज व्यासपीठावर विराजमान होण्याचे भाग्य मिळत आहे, हा मी माझा सन्मान समजतो. त्याहून अधिक भाग्य म्हणजे मी ज्यांचा संपूर्ण आयुष्यात सन्मान व आदर करत आलो त्या दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली. खरे म्हणजे माझ्या महाविद्यालयीन जीवनात मी दिलीप वेंगसरकर यांच्या एल्फ अकादमीमध्ये निवड व्हावी यासाठी प्रयत्नशील होतो, पण त्यात यश आले नाही. पण आयुष्य कोणते वळण घेईल आणि तुम्हाला कोणती संधी मिळेल हे काही सांगता येत नाही. आज मी वेंगसरकर यांची भूमिका साकारतो आहे. ही बाब माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची व विशेष आहे, असे उद्गार आदिनाथ कोठारे यांनी काढले. १९८३ साली भारताने जिंकलेल्या विश्वचषकावर आधारित जो ८३ हा चित्रपट निघत आहे, त्यात आदिनाथ हा दिलीप वेंगसरकर यांची भूमिका निभावतो आहे.

About Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …