ठळक बातम्या

भारताचे न्यूझीलंडसमोर २८४ धावांचे आव्हान

  •  अय्यर व साहाचे दमदार अर्धशतक

कानपूर – श्रेयस अय्यर व रिद्धिमान साहा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने विषम परिस्थितीतून सावरत पहिल्या क्रिकेट कसोटीच्या चौथ्या दिवशी रविवारी येथे दुसऱ्या डावात ७ बाद २३४ धावांवर आपला डाव घोषित करत न्यूझीलंडसमोर २८४ धावांचे लक्ष्य दिले. न्यूझीलंडने लक्ष्याचा पाठलाग करताना सलामी फलंदाज विल यंग (०२) चा विकेट गमावत चार धावा केल्या आहेत. किवी संघाला अखेरच्या दिवशी विजय मिळवण्यासाठी २८० धावा करायच्या आहेत. खेळपट्टीवर टॉम लॅथम दोन धावा करत खेळत आहे, तर ‘नाईट वॉचमन’ विलियम समरविलेने अद्याप आपले खाते खोलले नाही.
पदार्पण कसोटीच्या पहिल्य डावात शतक ठोकणारा अय्यर (१२५ चेंडूंत ६५ धावा, आठ चौकार व एक षटकार)ने दुसऱ्या डावात देखील दबावाच्या काळात अर्धशतक झळकावले व हे यश प्राप्त करणारा तो पहिला भारतीय बनला आहे. त्याने रविचंद्रन अश्विन (३२) सोबत सहाव्या विकेटसाठी ५२, तर साहा (नाबाद ६१, चार चौकार व एक षटकार) सोबत सातव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचली. न्यूझीलंडच्या लतीने काइल जैमीसनने ४० तर टीम साऊथीने ७५ धावांवर प्रत्येकी तीन विकेट मिळवल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय खेळपट्टीवर परदेशी संघाने केव्हा एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना विजय नोंदवलेला नाही. हा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावे आहे, ज्यांनी १९८७ मध्ये नवी दिल्लीत २७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केलेला. न्यूझीलंडने डावातील तिसऱ्याच षटकात यंगचा विकेट गमावला, ज्याला अश्विनने पायचीत केले. यंगने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला, पण तोपर्यंत १५ सेकंदाची वेळ संपली होती व त्याला माघारी परतावे लागले. रिप्ले पाहिला असता चेंडू यष्टीपासून लांब असल्याचे पाहण्यास मिळाले. तर भारतीय फलंदाजीचा विचार करता सकाळच्या सत्रात कर्णधार अजिंक्य रहाणे (४) व चेतेश्वर पुजारा (२२)ने पुन्हा एकदा निराश केले, ज्यामुळे भारताची स्थिती ५ बाद ५१ धावा अशी झाली होती. दरम्यान, अय्यरने अश्विन व त्यानंतर साहासोबत अर्धशतकीय भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. अय्यर चहापानाआधी साऊथीच्या अखेरच्या चेंडूवर यष्टीरक्षक टॉम ब्लंडेलला झेल देत माघारी परतला.

आता ही खेळपट्टी फिरकीपटूंच्या मनमर्जीतली झाली असून, भारतीय फिरकीपटू धावसंख्येचा बचाव करण्यास सक्षम आहेत. चेंडू फिरकी घेत नसला तरी पाचव्या दिवशी चेंडू खूपच खाली राहील अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांना साऊथीने आपल्या स्विंगने अधिक अडचणीत आणले. त्याला जैमीसनची चांगली साथ लाभली. जैमीसनने पुजाराला ब्लंडेलकरवी झेलबाद करत मोठे यश मिळवले. रहाणेने एक चौकार मारला, पण एजाज पटेलने त्याला पायचित केले. सलामी फलंदाज मयंक अग्रवाल (१७)ने पहिल्या तासात न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा दटून सामना केला, पण साऊथीने आऊटस्विंगवर दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या लॅथमकरवी झेलबाद केले. साऊथीने त्याच षटकात रवींद्र जडेजाला भोपळाही फोडू न देता भारताला पाचवा धक्का दिला. अश्विन त्यानंतर अय्यरसोबत उतरला व त्याने साऊथीवर सरळ चौकार ठोकण्यासह काही आकर्षक शॉटचा नजराणा दाखवला. अय्यरने १०९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. चहापानानंतर साहा व अक्षर पटेलने संघाची धावसंख्या २०० पार नेली. साहाने समरविलेच्या चेंडूवर दोन धावांसह ११५ चेंडूंत आपले सहावे अर्धशतक पूर्ण केले.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …