ह्युस्टन – मनिका बत्रा विश्व टेबल टेनिस चॅम्पियनशीपच्या महिला दुहेरी व मिश्र दुहेरी क्वार्टर फायनलमध्ये पोहचली, जिथे भारत ऐतिहासिक पदक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल लांब आहे. मनिका व अर्चना कामत यांनी हंगेरीच्या डोरा माडाराज व जॉर्जिना पोटाचा ११-४, ११-९, ६-११, ११-७ असा पराभव केला. आता त्यांचा सामना लक्झेमबर्गच्या सारा डे नुटे व शिया लियान निशी होईल. सेमिफायनलमध्ये पराभूत होणाऱ्यालाही कांस्य पदक मिळणार आहे. मिश्र दुहेरीमध्ये मनिका व जी. साथियानने दोन गेम गमावल्यानंतर शानदार पुनरागमन करताना अमेरिकेच्या कनक झा व चीनच्या वाँग मानयुचा पराभव केला. त्यांनी १५-१७, १०-१२, १२-१०, ११-६, ११-७ असा विजय मिळवला. आता त्यांचा सामना जपानच्या हारिमोतो तोमोकाजू व हयाता हिना यांच्याशी होईल. साथियान म्हणाला की, ही शानदार स्पर्धा राहिली. बळकट संघाविरुद्ध आम्ही चांगले पुनरागमन केले. आम्ही ही लय कायम राखू. जपान जोडीविरुद्ध सामना कठीण होईल, पण आम्ही आपली सर्वोत्कृष्ट कागमिरी करू. मिश्र दुहेरीत अचंत शरथ कमल व अर्चनाला प्री क्वार्टर फायनलमध्ये फ्रान्सच्या जिया नान युआन व एमॅन्युएल लेबेसनकडून पराभवाचा सामना करावा लागला.