भारताचा पहिला डाव २२३ धावांवर आटोपला

केपटाऊन – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना सुरू असून, भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा खराब प्रदर्शन केले आहे. कर्णधार कोहलीच्या ७९ आणि पुजाराच्या ४७ धावा सोडता इतर फलंदाज काहीच खास कामगिरी करू शकले नाही. किंग विराट कोहलीचे शतक पुन्हा एकदा हुकल्याने भारतीय चाहते निराश झाले असून, आता सामन्यात टिकून राहण्यासाठी भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजी घेतली. त्यानंतर सलामीवीर राहुल, मयांक आणि रहाणे स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर भारताचा अनुभवी पुजाराने ४३ धावा केल्या खऱ्या पण तोही बाद झाला. त्यानंतर विराटने एका बाजूने मोर्चा सांभाळला पण त्याला कोणाची साथ न मिळाल्याने अखेर तोही ७९ धावा करून बाद झाला आणि भारताचा डाव २२३ धावांवर आटोपला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका सध्या १-१च्या बरोबरीत असून, यामुळे भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे, कारण ही कसोटी जिंकताच भारत मालिकाही जिंकेल आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा मान भारताला मिळेल. पण केपटाऊनमधला हा विजय भारताला सोपा नसून आतापर्यंत या मैदानात खेळलेल्या पाच पैकी पाच सामन्यांत भारताला एकदाही विजय मिळवता आलेला नाही.
मयांक अग्रवाल आणि के. एल. राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. भारताचे अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वी हे दोघे तंबूत परतले. डुआन ऑलिव्हियरने राहुलला (१२), तर कगिसो रबाडाने मयांकला (१५) झेलबाद केले. लंचपर्यंत विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. लंचनंतर भारताने शतक पूर्ण केले; पण डाव गडबडला. चांगल्या लयीत खेळणाऱ्या पुजाराला वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने झेलबाद केले. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे रबाडाचा बळी ठरला. पुजाराने ७ चौकारांसह ४३, तर रहाणेने ९ धावा केल्या. चहापानापर्यंत भारताने ५४ षटकांत ४ बाद १४१ धावा केल्या. चहापानानंतर भारताने पंतच्या रूपात आपला पाचवा फलंदाज गमावला. जानसेनने त्याला बाद केले.
विराटने संयमी अर्धशतक फलकावर लावले. १६७ धावांत भारताने ५ फलंदाज बाद झाले. त्यानंतर भारताचे एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत राहिले. विराटने आक्रमक पवित्रा धारण करीत झटपट धावा घेत संघाची धावसंख्या दोनशेपार पोहोचवली. तो शतकाचा दुष्काळ संपवणार असे वाटत असताना बाद झाला. ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूवर विराटला रबाडाने तंबूत धाडले. विराटने २०१ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि एक षटकारासह ७९ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर आफ्रिकेने भारताचा पहिला डाव लवकर संपुष्टात आणला. पहिल्या डावात भारताने ७७.३ षटकात सर्वबाद २२३ धावा केल्या. आफ्रिकेकडून रबाडाने ४, जानसेनने ३ बळी घेतले. लुंगी एनगिडी, डुआन ऑलिव्हियर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक बळी मिळाला. रात्री उशिरापर्यंत दक्षिण आफ्रिका संघाचा डाव सुरू झाला. दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार डीन एल्गर १६ चेंडूंमध्ये ३ धावा काढून तंबूत परतला. बुमराहने पुजाराकरवी त्याला झेलबाद केले. ॲडन मार्क्र म (८), केशव महाराज (६) धावांवर खेळत आहेत. दिवसअखेर दक्षिण आफ्रिका संघाची धावसंख्या १ बाद १७ अशी झाली आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …