दुबई – टी २० विश्वचषकातील आव्हान संपुष्ठात आल्यानंतर केवळ औपचारिकता राहिलेला नामिबियाविरुद्धचा अखेरचा सामना भारताने ९ गडी आणि २८ चेंडू राखून सहज जिंकला. अश्विन आणि जडेजाच्या फिरकीपुढे नामिबियाच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. त्यांना केवळ १३२ धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात अश्विन व जडेजा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
नामिबियाच्या माफक १३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा आणि के एल राहूलने धडाकेबाज सुरुवात केली. दोघांनी नामिबियाच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. दहाव्या षटकात धावफलकावर ८६ धावा असताना जॅन फ्रायलिंकच्या गोलंदाजीवर रोहित बाद झाला. त्याने ३७ चेंडूत ५७ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवसोबत राहुलने फटकेबाजी सुरुच ठेवून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३६ चेंडूंत नाबाद ५४ धावा केल्या तर सूर्यकुमारने नाबाद २५ धावा केल्या आणि भारताने १६ व्या षटकातच नामिबियाचे आव्हान गाठले.
तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला़ आऱ अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीपुढे नामिबियाच्या फलंदाजांची पुरती दमछाक झाली़ नामिबियाच्या धावफलकावर अवघ्या ३३ धावा असताना बुमराहने त्यांची सलामी जोडी फोडली. मायकल वॅन १४ धावा करुन तंबूत परतला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या क्रॅग विल्यमसनला जडेजाने खातेही उघडू दिले नाही. ठराविक अंतराने जडेजा आणि अश्विनने नामिबियाला धक्के दिले. ७२ धावांत नामिबियाचा अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यामुळे त्यांना शंभर धावा करणेही कठीण जाईल, असे वाटत होते. पण अष्टपैलू विसेने २६ धावांची चिवट खेळी करुन संघाचा डाव सावरला. तळाच्या फलंदाजीत जॅन फ्रायलिंकने नाबाद १५ तर रिबेनने ६ चेंडूत १३ धावांची खेळी केली. त्यामुळे नामिबियाला निर्धारित २० षटकांत ८ गड्यांच्या बदल्यात १३२ धावांपर्यंत मजल मारता आली़
अवश्य वाचा
एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत
कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …