भाडेकरूशी झालेल्या वादामुळे मला ड्रग्जप्रकरणात अडकवले : समीर वानखेडेंवर २० वर्षीय तरुणाचा आरोप

मुंबई – एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे खंडणीखोरीच्या आरोपांमुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले असतानाच, त्यांच्याविरोधात आणखी एक प्रकरण पुढे आले आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या झैद राणा या २० वर्षीय तरुणाने वानखेडे यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. झैद राणा राहत असलेल्या घराशेजारीच वानखेडे कुटुंबाचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट भाड्याने दिलेला आहे. भाडेकरू व झैद राणा याच्या आई-वडिलांमध्ये काही कारणावरून क्षुल्लक वाद झाला होता. त्या भांडणाचा राग मनात ठेवून वानखेडे यांनी मला ड्रग्ज प्रकरणात अडकवले, असा आरोप करत झैदने न्यायालयाकडे जामिनाची विनंती केली आहे.
एप्रिल महिन्यात झैदच्या ओशिवरा येथील घरातील ड्रॉवरमध्ये व स्कूटरवर मॅरिजुआना, चरस व इतर अमली पदार्थ एनसीबीने जप्त केल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी राणा व त्याचा मित्र सोनू फैजला अटक करण्यात आली. आता आर्यन खान प्रकरणानंतर वानखेडे यांच्यावर आरोप होऊ लागल्यावर धाडस करून संबंधित तरुणाने आपल्या जामीन अर्जात हा आरोप केला आहे. व्यक्तिगत शत्रुत्व काढण्यासाठी वानखेडे यांनी हे सगळे केल्याचे त्याने म्हटले आहे. वानखेडे यांनी स्वत: माझ्या घरात ड्रग्ज ठेवले होते, असा आरोप झैद राणाने केला आहे. या प्रकरणात ऑक्टोबरमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात अनेक चुकीचे दावे करण्यात आले आहेत. समीर वानखेडे हे घटनास्थळी उपस्थित असतानाही तसे नमूद करणे सोयीस्करपणे टाळण्यात आले आहे, मात्र इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास सत्य समोर येईल. त्यामुळे संबंधित ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे, अशी मागणी आरोपींनी अन्य एका अर्जाद्वारे केली आहे. त्याचबरोबर हे प्रकरण वानखेडे यांचा संबंध नसलेल्या एखाद्या यंत्रणेकडे सोपवावे, अशी मागणीही आरोपींनी केली आहे.
झैद राणा याच्या जामीन अर्जावर एनसीबीने उत्तर दाखल करावे, असे निर्देश विशेष एनडीपीएस कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी शनिवारी होणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …