भाजप-शिवसेनेतील युतीचा पूल गडकरीच बांधू शकतात – सत्तार

नवी दिल्ली – देशभरातले पूल बांधणारे मंत्री म्हणून ख्याती असलेले नितीन गडकरी हेच शिवसेना आणि भाजपमधील युतीचा पूल बांधू शकतात, असे मोठे वक्तव्य शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी येथे केले. अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप आणि शिवसेना एकत्र येण्यासंदर्भातील हे वक्तव्य केले. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. राज्यात हे सरकार फार काळ टिकणार नाही, अडीच वर्षे होताच भाजप-शिवसेना पुन्हा जवळ येतील, अशी चर्चा असतानाच अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्राचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हटले की, राज्यात कोणतेही परिवर्तन घडवायचे असेल, तर त्याची चावी म्हणजे नितीन गडकरी आहेत. नितीन गडकरी यांच्यासोबत आमचे जुने संबंध आहेत. त्यांचे सर्वांशीच चांगले संबंध आहेत. मग ते विरोधक का असेनात. गडकरी हे राजकारणातील विद्यापीठ आहेत. त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचेही जुने संबंध आहेत. भाजप आणि युतीचा पूल बांधायचा असेल, तर ते फक्त गडकरीच करू शकतात, परंतु युतीचा निर्णय शेवटी उद्धव ठाकरेच घेतील, असे वक्तव्यही अब्दुल सत्तार यांनी केले. अब्दुल सत्तार यांनी नितीन गडकरी यांच्याशी भेटीवेळी जळगाव-औरंगाबाद रस्त्याचे काम जलदगतीने व्हावे, अशी मागणी केली. या रस्त्याची २०० कोटी रुपयांची कामे बाकी होती. हा निधी गडकरी यांनी तातडीने मंजूर केल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.
रश्मी ठाकरे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात
अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे या उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात, असे वक्तव्यही केले आहे. सत्तार म्हणाले की, रश्मीताईंची काम करण्याची पद्धत एक अभ्यासू महिला अशी आहे. आज त्या पडद्यामागे काम करीत असतात. त्या पडद्याच्या पुढे नाहीत. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बऱ्यापैकी माहिती असते. कारण त्या साहेबांच्या सोबत राहतात. कशा पद्धतीने महिला सक्षम व्हायला पाहिजेत, त्यांचे बळकटीकरण कसे व्हायला पाहिजे, महिलांना फक्त चूल आणि मूल न करता, त्यांना सक्षम कसे करायला पाहिजे यासाठी ताईसाहेबांचे काम मोठे आहे. उद्धव साहेबांचा आदेश असेल, तर मला वाटते काहीही होऊ शकते. मला वाटते त्यांच्यावर जबाबदारी देऊही शकतात, असे मत सत्तार यांनी मांडले आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …