भाजप आमदारांनी रामाची आणि विठोबाची जमीन लाटली; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी येथे एक पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आणि खळबळजनक आरोप केला. भाजपच्या आमदारांनी रामाची जागा लाटल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला. जमीन घोटाळाप्रकरणी वक्फ बोर्डाकडून एकूण ११ तक्रारी आम्ही दाखल केल्या आहेत. नांदेड, औरंगाबाद, परभणी, पुणे, जालना, बदलापूर, बीड आणि औरंगाबाद या ठिकाणी या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यासोबतच एका मशिदीच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे मलिक यांनी सांगितले. आष्टीमध्ये तीन दर्गा आणि मशिदीच्या जागेवर बेकायदेशीरपणे सर्व्हिस इनाम ऐवजी मदत इनाम जाहीर करून खासगी नावे चढवली. यानंतर हे प्लॉट्स विक्री करण्याचे काम सुरू केले याची माहिती आम्हाला मिळताच आम्ही तक्रारी दाखल केल्या. हिंदू देवस्थानच्या सात जागा आणि मुस्लीम देवस्थानच्या तीन अशा एकूण १० ठिकाणी देवस्थानच्या जागांवर भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप मलिक यांनी केला.
नवाब मलिक म्हणाले, मंदिराच्या जागेवर सुद्धा भ्रष्टाचार झाला आहे. मुर्शीदपूर येथील विठोबा देवस्थान ४१ एकर ३२ गुंठे, पांढरी तालुका आष्टी खंडोबा देवस्थान ३५ एकर, श्रीराम देवस्थान तालुका आष्टी २९ एकर, चिखली हिंगणी श्रीराम देवस्थान १५ एकर, चिंचपूर राम देवस्थान ६५ एकर, बेळगाव खंडोबा देवस्थान ६० एकर आणि खडकर विठोबा देवस्थान ५० एकर, अशी एकूण ३०० एकर हिंदू देवस्थानांची जमीन खालसा करण्याचे काम अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाले आहे, असे ते म्हणाले. यात वक्फ बोर्डाच्या चिंचपूर मशीद इनाम – ६० एकर, रुई नालकोल – बुहा देवस्थान – १०३ एकर, देवीनिमगाव – मशीद इनाम -५० एकर अशा दर्गा इनामच्या तीन देवस्थानांच्या २१३ एकर जमिनींचा समावेश आहे.
२०१७ सालापासून हा उद्योग सुरू असल्याचेही नवाब मलिक म्हणाले. २०१७ पासून २०२० पर्यंत देवस्थानाच्या जमिनी हडप केल्या गेल्या आहेत. या प्रकरणाचा तपास योग्यरीतीने व्हावा यासाठी गृहमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी यासाठी एसआयटीची नेमणूक केली. एसआयटीने दोन गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. राम खाडे यांनी गृह, महसूल आणि ईडीकडे या दहा प्रकरणांची तक्रार दाखल केली आहे. या सर्व प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे या दोन आमदारांचे नाव असल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …