साधारण साठच्या दशकात, कुठल्याही कुटुंबात बहीण-भावांचा एकंदर आकडा अंदाजे तीन भाऊ तीन बहिणी, चार भाऊ पाच बहिणी, एक भाऊ सात बहिणी या हिशोबाने असायचा. एकुलता एक किंवा एकुलती एक किंवा एक भाऊ आणि एक बहीण हा हिशोब अगदी दुर्मीळ. असा भावा-बहिणींचा एकंदर आकडा अगदी ११-१२पर्यंत देखील असायचा आणि त्यात दचकण्या सारखं वगैरे कोणाला काही वाटायचं नाही आणि अशा बहुतेक कुटुंबांची आर्थिक स्थिती अगदी बेतासबात. मुलांच्या बाबतीत समृद्धी अफाट. यातली बरीचशी मुले टगी या कॅटेगरीत मोडणारी. कुपोषण हा शब्ददेखील त्याकाळी कोणाला माहीत नव्हता. खूप मुलं-मुली म्हणजे कुटुंबाची शान. सगळी स्वयंसिद्ध, स्वाभिमानी, आरे ला कारे म्हणणारी. इन्फेक्शन, प्रोब्लेम, टेन्शन, असले शब्द त्यांच्या नावी गावीही नसणारी. प्रत्येक सण आनंदाने साजरा करणारी. अशा कुटुंबात दिवाळीचा सण साजरा होत असताना, काटकसर तर हमखास, ती तर अंगवळणी पडल्या सारखीच. दुर्भिक्ष आणि आनंद याचा अपूर्व असा मिलाफ अनुभवायला येई. सगळं हात राखून पण त्याचा आनंद मात्र ओतप्रोत.
त्या काळातील अशा घरातील भाऊबीज म्हणजे जोपर्यंत घरातली मुलं-मुली शिकतायत तोपर्यंत वडील प्रत्येक मुलाला भाऊबीज म्हणून घालण्यासाठी एखादा रुपया किंवा कधी-कधी नुसतीच सुपारी देखील. भाऊबीजेच्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्या झाल्या हातावर ठेवत. त्यादिवशी दिवाळीचा फराळ झाला की, लांब लचक सतरंजीची घडी किंवा पाट मांडून सगळ्या बहिणींची ओवाळणी पार पडत असे. मला आठवत नाही, कुठल्याही बहिणीला किंवा भावाला आपण काय रक्कम ओवळणी म्हणून देतोय किंवा घेतोय याचे वैषम्य वाटलंय. त्या काळात आनंदाचे, समाधानाचे आणि रकमेच्या आकड्याचे दूर दूरचही नातं नव्हतं. त्यामुळे भावांनी फक्त सुपारी ओवाळणी म्हणून दिली काय किंवा दोन रुपयांची नोट टाकली काय, समाधान आणि आनंद तोच, अगदी पुरेपूर.
बहिणींची लग्न झाली आणि मुले नोकरीला लागले की, मात्र सीन थोडा बदलायचा. दोन-तीन भाऊ असले की, ते कुठल्या बहिणीकडे कोण जाणार हे आपसात ठरवून त्याप्रमाणे जायचे; पण एकच भाऊ आणि तीन-चार कधी-कधी अगदी सातदेखील लग्न झालेल्या बहिणी म्हणजे भावाची तारांबळ बघायला नको. भावांचा त्या भाऊबीजेच्या दिवसाचा कार्यक्रम एकंदर ठरलेला असायचा. जाण्याची ठिकाणे तरी किती आणि कुठल्या कुठल्या दिशेला? गिरगाव हे निश्चित, डोंबिवली, बोरिवली, भांडुप, लालबाग, चेंबुर, पनवेल, भाऊबीजेच्या दिवशी अगदी पहाटे उठून जवळचे रेल्वे स्टेशन गाठायचे, वेस्टर्न, सेंट्रलचे सामयिक रिटर्न तिकीट काढून पहिली गाडी पकडून प्रवास सुरू करायचा. त्या दिवशी फक्त वेळ वाचविण्यासाठी म्हणून बसने, रिक्षाने, टांग्याने फिरण्याची चैन करण्याची मुभा असायची. शक्यतो चालतच आणि एकाच रिटर्न तिकिटाचा वापर करत सर्व बहिणींची घरे गाठायची. जाताना प्रत्येक बहिणीसाठी आईने दिलेला किंवा बायकोनी दिलेली घरगुती फराळाची पुडी, भाचे कंपनीसाठी लवंगी फटाक्याचे आणि केपाची डब्बी आणि फुलबाज्याचे एक-एक पाकीट. बँकेतल्या मित्राकडून खास एक-दोन रुपयांच्या किंवा फार-फार तर पाच रुपयांच्या कोºया करकरीत नोटा. भाऊबीजेची ओवाळणीसाठी बरोबर घेतलेल्या. कपाळावर ओल्या लाल कुंकवाचा मोठा टिळा बºयाच बहिणी असतील, तर अगदी मळवट भरल्यासारखा सगळ्या कपाळभर पसरलेला ओले कुंकू आणि त्यावर चिकटलेल्या आणि डोक्यावरील केसात अडकलेल्या असंख्य अक्षता, असे भाऊराया बसच्या, रेल्वेच्या, एसटीच्या गर्दीत धक्के खात प्रवास करताना दृष्टीस पडत; पण कोणाच्याही चेहºयावर त्रासिक भाव नाही. सकाळी निघताना चांगले इस्त्री करून घातलेले कपडे अखेरच्या बहिणीच्या घरी जाईपर्यंत गर्दीत चुरगळून पार त्याची रया गेलेली असायची; पण त्याला इतके महत्त्व द्यावे असे कोणालाच वाटत नसल्यामुळे त्याची फिकीर नसायची. प्रवासाची दगदग नाही. घामाची परवा नाही. कपाळावरचे लाल गंध आणि असंख्य अक्षता अभिमानाने मिरवत, बहिणीने दिलेल्या फराळाची पुडीसोबत घेऊन रात्री अगदी सामाधानाने आणि आनंदाने भाऊरायाची स्वारी घरी परतायची.
सगळ्या बहिणींचे क्षेम कुशल आई-वडिलांच्या कानावर घालायचे, भाऊबीजेच्या दुसºया दिवसाचा तो एक अगत्याचा कार्यक्रम म्हणून न विसरता पार पडायचा. फोन नव्हते, मोबाईल तर स्वप्नात देखील नव्हते, तरीही दरवर्षी हे सर्व हमखास आणि आनंदाने पार पडायचे. कसे? ते मात्र माहीत नाही. तो एक काळाचा महिमा.
– मोहन गद्रे\\