भरकटलेली मालिका ‘जय जय स्वामी समर्थ’

कलर्स मराठीवर दररोज रात्री आठ वाजता गेले दहा महिने प्रेक्षक जय जय स्वामी समर्थ ही मालिका पाहत आहेत. सुरुवातीच्या काळात ही मालिका अतिशय सुरेख आणि रंगतदार पद्धतीने चालली होती, परंतु गेल्या तीन महिन्यांपासून ही मालिका अत्यंत भरकटत चालली असून, यात काल्पनिक कथानकांमुळे स्वामी समर्थांचे अवमूल्यन करण्याचा प्रकार चालवला आहे. तो थांबवला पाहिजे, अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. संत, महंतांच्या नावावर वाटेल ते काल्पनिक प्रकार खपवून स्वत:चे महत्त्व वाढवण्याचे लेखक आणि निर्माते करत असतील, तर त्यांनी कार्टून फिल्म काढाव्यात; पण असले प्रकार थांबवले पाहिजेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून तो जालिंदरबाबा नावाचा कोणी सिद्ध पुरुष या मालिकेत दाखल झाला आहे. त्याला अक्कलकोटवर राज्य करायचे आहे, म्हणून तो आलेला आहे. त्यासाठी रामाचार्यांची मदत घेऊन तो स्वामी समर्थांना छळायला येत आहे. या जालिंदरबाबाचे कथानक दाखवताना तळटीप येते की, हा प्रसंग काल्पनिक असून, तत्कालीन परिस्थिती आणि माणसांची वृत्ती दाखवण्यासाठी हा प्रसंग आहे. काय गरज आहे, अशा प्रसंगाची? तो जालिंदरबाबा त्या सोमनाथ नावाच्या शिष्याला छळतो आहे. त्याला चटके देतो आहे. त्याला लाथेने तुडवतो आहे. अक्कलकोटवर राज्य करण्यासाठी त्याची ही धडपड चालली आहे आणि त्यासाठी गावातल्या लोकांना एक तोळे सोने तो वाटतो आहे.

आता प्रश्न पडतो की, अक्कलकोटवर राज्य कोण करणार आहे. तिकडे तो दाजिबा सरकार आहे. मालोजीराजे आहे. प्रत्यक्षातला काळ हा ब्रिटिशकालीन आहे. यात जालिंदरबाबाला कसले राज्य हवे आहे? स्वामी समर्थांशी स्पर्धा करायला हा जालिंदरबाबा आल्याचे कथानक अगदी फालतू असे वाटते. स्वामींचे एकेक नवनवे चमत्कार दाखवण्यासाठी चाललेला हा आटापिटा आणि त्यासाठी होत असलेला काल्पनिकतेचा वापर यामुळे मालिकेचा दर्जा घसरत जात आहे. स्वामींच्या चरित्रात असलेल्या सत्य कथाच दाखवणे अपेक्षित आहे. किंबहुना स्वामी भक्तांचा फार मोठा संप्रदाय आहे. या संप्रदायाशी संपर्क साधून आलेले अनुभव, अनुभूती या कथानकात टाकली तर चालेल; पण कधी ती राधा तमासगिरीण आणि तिची वेडी बहीण हे काल्पनिक कथानक, आता जालिंदरबाबाचे कथानक हे असले प्रकार अत्यंत पोरकट वाटतात.
फावल्या वेळात स्वामी गोट्या खेळताना दाखवले आहेत. एवढे मोठे व्यक्तिमत्व असेल, तर ते गोट्या खेळत असतील असे वाटते का? ती चंदा ही स्वामीभक्त आहे. तिच्याशी लग्न करण्यासाठी तो दाजिबा सरकार आपल्या राणीला, देवयानीला दररोज गुंगीचे औषध देऊन आजारी पाडत आहे. चंदाशी लग्न करण्यासाठी त्याचा चाललेला आटापिटा अत्यंत खोटारडेपणाचा वाटतो. एवढा मोठा संस्थानिक आहे तो अशा एका सामान्य मुलीच्या मागे लागतो आहे आणि त्यासाठी आपली राजघराण्यातील असलेली बायको मारण्यासाठी टपला आहे, हे न पटणारेच आहे. या कथानकांना काही आधार आहे का? चंदामध्ये असे काय आहे की, ती देवयानीपेक्षा दाजिबा सरकारला आवडत आहे? एकतर ती इतकी लहान परकर पोलक्यातील मुलगी आहे आणि सामान्य आहे. असे असताना तिच्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याचा जो आचरटपणा चालवला आहे, तो हिडीस दिसतो. यातील सगळ्या खलप्रवृत्तींच्या पात्रांना एक दणकेबाज उखाण्याप्रमाणे वाक्य दिले आहे. ‘दाजीबाचा सुभा, तिथं नाही कुणाला मुभा’ असं म्हणून दाजिबा पत्रा घासल्यासारखा खसखसखसखस करत हसतो. चंदाची सावत्र आई कालिंदीची अशीच एक स्टाईल आहे. ‘कालिंदीशी वाकडं, त्याची मसणात गेली लाकडं’ तसाच आता तो जालिंदरबाबा, ‘हरीहरी… माझा हात ज्याच्या शिरी, त्यालाच पावेल श्रीहरी’ असं काही बरळतो आहे. स्वामींपुढे फज्जा उडाल्यावर संतापलेला जालिंदरबाबा शेकोटी पुढे बसतो तेव्हा तो शॉट अक्षरश: शोलेतील अमजदखान स्टाईलने घेतला आहे. एकूणच काल्पनिक आणि अतर्क्य कथानकं गुंफून ही मालिका भरकटत चालली आहे, असे दिसते.

या मालिकेत अनेक पात्र आपल्या सवडीनुसार येत असतात. चोळप्पाचा मुलगा कृष्णप्पा मध्यंतरी खूप दिवस गायब होता. तो पुन्हा मागच्या महिन्यापासून दाखल झाला आहे. आता गेल्या तीन-चार महिन्यांपासून चंदाची सावत्र बहीण आणि कालिंदीची लाडकी सारजा कुठे गायब आहे. चंदाला छळण्यासाठी पूर्वी कालिंदीला मदत करणारी ती हरी सुताराची मुलगी अचानक कुठे गायब झाली हे बोलायचे नाही. रामाचार्यांना दोन मुली आहेत. मुलगा नाही म्हणून तो बायकोचा तिरस्कार करतो आहे. त्या मुलीपण गेल्या काही दिवसांपासून गायब केल्या आहेत. दाजिबांची पहिली बायको देवयानी अशीच थोडे दिवस गायब केली होती. त्यानंतर कलाकार बदलून दुसरीच देवयानी दाखल झाली. अशी सगळी सवडीने येणारी पात्र घेऊन ओंगळवाणं कथानक सादर केलं जात आहे. या विषयावर अनेक कथानकं आलेली आहेत. चित्रपट बनले आहेत, मालिका बनल्या आहेत. त्यामुळे तोच तो पणा टाळण्यासाठी मूळ स्वामींचे चरित्र दाखवण्याऐवजी भलतेच काल्पनिक प्रसंग गुंफण्याचा जो प्रकार चालला आहे तो योग्य नाही. त्यामुळे कथानक संपले असेल, तर ही मालिका संपवावी लागेल. यापूर्वी दत्त संप्रदायाचा आढावा घेणारी एक भव्य मालिका दीपक देऊळकर यांनी आणली होती; पण काल्पनिकतेचा अतिरेक झाल्याने ती बंद करण्याची वेळ आली, तसेच या मालिकेचे भवितव्य दिसत आहे.
प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा

9152448055 \\

About Editor

अवश्य वाचा

आसामी दणका

 गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा आसाम पोलिसांनी गुजरातमधील पालनपूर येथील सर्किट हाऊसमधून …