- वीज कोसळून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू
भंडारा – येथे अवकाळी पावसामुळे एका निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागला. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धुसडा नवेगाव शिवारात आजोबांसोबत म्हशी राखण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय नातवाचा वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर शेतामध्ये दावणीला बांधलेला बैलही दगावला. त्यामुळे अवकाळी पावसाने केवळ रब्बी आणि खरिपातील पिकांचेच नुकसान झाले नाही, तर मनुष्यहानीही झाल्याचे पाहण्यास मिळाले. नयन परमेश्वर पुंडे, असे मृत मुलाचे नाव आहे.
जनावर चारण्यासाठी नयनचे आजोबा रोज शिवारातील पडीक क्षेत्रावर जात होते. त्यांच्यासोबत नातू नयनही गेला होता. म्हैस चारत असताना अचानक विजेचा कडकडाट झाला व वीज नयनच्या अंगावर कोसळली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरीकडे गोठ्यातील दावणीला बांधलेल्या बैलही दगावला आहे. त्यामुळे पुंडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, या दुर्दैवी घटनेत ९ वर्षांच्या नयनला जीव गमवावा लागल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात होती. दरम्यान, रब्बीची पेरणी होऊन १५ दिवसांचाच कालावधी लोटलेला होता. पिकांची उगवण होताच झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे सर्व भाजीपालाही पाण्यात आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून त्वरीत नुकसानभरपाई देण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत. मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती कामे तर खोळंबलेली आहेतच पण शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणीसाठी केलेला खर्च आणि आता खरिपातील पिकांचे होणारे उत्पादन असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. भंडाऱ्यातील तुमसर व मोहाडी तालुक्यात मंगळवारी गारपीठ देखील झाली. मोहाडीतील उसरी, लोहारा, गायमुख, सोरणा, जांब व कान्द्री तर तुमसर तालुक्यातील पवनार व अनेक ग्रामीण भागांत गारपीट झाल्याचे चित्र होते.