लंडन – ब्रिटनमध्ये दररोज ओमिक्रॉनची लागण झालेल्या हजारो लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे, तर पुढील ५ महिन्यांत ब्रिटनमध्ये सुमारे २५ ते ७५ हजार जणांचा बळी जाईल, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. त्यातच सोमवारी कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे ३० पेक्षा अधिक वयाच्या लोकांनी कोरोना व्हॅक्सिनचा बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन करतानाच ओमिक्रॉनकडे जराही दुर्लक्ष करू नका, असा सावधानतेचा इशारा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर ब्रिटनमध्ये खळबळ माजली आहे.
लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या संशोधकांनी ओमिक्रॉनमुळे ब्रिटनपुढे मोठे संकट उभे ठाकल्याचा दावा केला आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनच्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. येथे दररोज ६०० हून अधिक रुग्ण आढळताहेत. यावर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने पावले उचलली नाही, तर पुढील ५ महिन्यांत ब्रिटनमध्ये सुमारे २५ ते ७५ हजार जणांचा बळी जाण्याची शक्यता आहे, असे संशोधकांनी म्हटले आहे. ओमिक्रॉनवर नियंत्रण मिळाले नाही, तर त्याचा संसर्ग अल्फा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने वाढेल. ओमिक्रॉनची संसर्गक्षमता व इम्युनिटीला चकवा देण्याच्या गुणवैशिष्ट्यामुळे असे घडेल, असे ते म्हणालेत. त्यांनी याप्रकरणी २ चित्र मांडलेत. एकात त्यांनी एप्रिलपर्यंत दररोज २ हजार असे एकूण १ लाख ७५ रुग्णांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येईल व २४७०० जणांचा बळी जाईल, असा दावा केला आहे, तर दुसऱ्यात ४ लाख ९२ हजार रुग्णांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येईल व ७४८०० जणांचा मृत्यू होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. दुसरीकडे, ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ओमिक्रॉनची मोठी लाट येण्याच्या भीतीने १८ वर्षांवरील सर्वच प्रौढ नागरिकांना येत्या ३१ तारखेपर्यंत कोरोना लसीचा तिसरा म्हणजे बुस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर नागरिकांनी लसीसाठी प्रचंड गर्दी केल्यामुळे संपूर्ण व्यवस्था कोलमडली आहे. ब्रिटनमधील १२ वर्षांवरील ८० टक्क्यांहून अधिक लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत, तर ४० टक्के प्रौढांनी बुस्टर डोस घेतला आहे. उर्वरित लोकांना ३१ तारखेपर्यंत बुस्टर डोस देण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना दररोज १० लाख लोकांना लस द्यावी लागेल. ही अशक्यप्राय गोष्ट आहे, पण सरकारने लष्कराच्या मदतीने आव्हान पार करण्याचा विडा उचलला आहे.
लहान मुलांसाठी धोकादायक
ब्रिटिश तज्ज्ञानुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंट प्रत्येकासाठी एक मोठे आव्हान आहे. दक्षिण आफ्रिका आणि यूके डेटानुसार, हा व्हेरिएंट लहान मुलांसाठी धोकादायक आहे. आता तो लहान मुलांमध्ये पसरत आहे. त्यांच्यात मध्यम ते गंभीर लक्षणे पाहायला मिळत आहेत. याआधी कोरोनाचे जितके व्हेरिएंट आढळले तेव्हा मुलांमध्ये सौम्य किंवा काहीच लक्षणे आढळली नाही. ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे प्रत्येकामध्ये वेगवेगळी असू शकतात, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.