लंडन – ब्रिटनने आता कोव्हॅक्सिन लसीला आपात्कालीन वापराच्या यादीत समाविष्ट केल्यामुळे कोट्यवधी भारतीयांची क्वारंटाईन होण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे. २२ नोव्हेंबरपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या मान्यतेनंतर आता ब्रिटन सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोट्यवधी भारतीय नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
कोव्हिशिल्डपाठोपाठ भारतात सर्वाधिक घेतली जाणारी लस, अशी कोव्हॅक्सिनची ख्याती आहे. मात्र आतापर्यंत या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे ब्रिटननेदेखील या लसीला मान्यता दिली नव्हती. त्यामुळे ही लस घेतलेल्या कोट्यवधी भारतीयांना ब्रिटनमध्ये लसीकरण न झालेल्या नागरिकांच्या यादीत गणले जात होते; मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतर ब्रिटननेदेखील या लसीचा समावेश मान्यता असलेल्या लसींच्या यादीत केला आहे. यापूर्वी कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांनाच केवळ ब्रिटनमध्ये क्वारंटाईन न होता प्रवेश मिळत होता; मात्र कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांना ही सवलत मिळत नव्हती.