नवी दिल्ली – तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले ब्रिगेडियर लखविंदर सिंग लिद्दर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी येथील ब्रार चौक स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ब्रिगेडियर लखविंदर सिंग लिद्दर यांनी चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांचे संरक्षण सहाय्यक म्हणून काम केले होते. ब्रिगेडियर लिद्दर यांची पत्नी आणि त्यांच्या मुलीने ब्रार चौक, दिल्ली कँटॉन्मेंट येथे त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते. ब्रिगेडियर लिद्दर यांची पत्नी गीतिका लिद्दर यांनी साश्रू नयनांनी आपल्या पतीला अखेरचा निरोप दिला. त्यांना पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांतून दु:खाचा प्रवाह वाहत होता.
ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर हे देशाचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचे संरक्षण सल्लागार होते. त्यांची मुलगी आशना लिद्दर हिनेही साश्रू नयनांनी वडिलांचा शेवटचा निरोप घेतला. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर लिद्दर यांची मुलगी आशना लिद्दर म्हणाली की, मी आता १७ वर्षांची होणार आहे. माझे वडील १७ वर्षे माझ्यासोबत राहिले. त्याच्या चांगल्या आठवणी आम्ही सोबत घेऊन पुढे जाऊ. त्यांच्या जाण्याने संपूर्ण राष्ट्राचे नुकसान झाले आहे.
माझे वडील माझे चांगले मित्र आणि माझे हिरो होते. ते खूप आनंदी व्यक्ती होते आणि माझ्यासाठी माझी प्रेरणा होते. ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर यांची पत्नी गीतिका लिद्दर म्हणाल्या की, आपण त्यांना हसतमुखानेच निरोप द्यायला हवा. मुलगी त्यांना खूप मिस करेल. हे खूप मोठे नुकसान आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ब्रिगेडियर लखविंदर सिंग लिद्दर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर यांना श्रद्धांजली. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. ईश्वर त्यांना हे अपरिमित नुकसान सहन करण्याची शक्ती देवो.
अवश्य वाचा
शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण
राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …