आलिया भट्ट विरोधात मुंबईत तक्रार दाखल
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्याविरोधात अखेर मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकीकडे आलिया रणबीरसोबतच्या विवाहावरून चर्चेत असतानाच आता एका टीव्ही जाहिरातीमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. आलियाच्या कन्यादानवाल्या ब्राईडल वेअर अॅडमुळे निर्माण झालेला वाद अधिकच वाढत चालला आहे. मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एका
व्यक्तीने आलियाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
आलियाच्या या अॅडवरून गेल्या कित्येक आठवड्यांपासून वाद सुरू आहे. या अॅडमध्ये कन्यादान बदलून त्याचे कन्यामान करण्यात आल्याबद्दल समाजातील एका गटाने आक्षेप व्यक्त केला आहे. तक्रारकर्त्याने याचिकेत म्हटले आहे की आलियाची ही जाहिरात हिंदूच्या भावना दुखावणारी आहे. कारण यामध्ये कन्यादान हे प्रतिगामी पद्धतीने दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आलिया भट्ट आणि मान्यवर कंपनीविरोधात खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. ही अॅड येताच सोशल मीडियावरून त्यावर
प्रचंड टीका होऊ लागली. युजर्सचे म्हणणे आहे की, सर्व धर्मांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत परंतु केवळ हिंदू धर्मालाच जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे.