बैलगाडा शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – सुनील केदार


नवी दिल्ली – बैलगाडा शर्यती हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची माहिती, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी येथे दिली.
राज्यात बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. बैलगाडा शर्यतीसंदर्भात वरिष्ठ अधिवक्ता आणि राज्य शासनाचे वकील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी केदार दिल्लीत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्राने बैलगाडा शर्यत सुरू होण्याबाबत २०१७ रोजी कायदा संमत केला होता. तथापि, त्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर शासनाने या आदेशास अनुसरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण विस्तारित बेंचकडे प्रलंबित असून, पुढील आठवड्यात याबाबत निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून होण्याची शक्यता आहे. याबाबतच्या सविस्तर चर्चेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपस्थित अधिवक्त्यांशी चर्चा करण्यात आल्याचे केदार यांनी नमूद केले.
देशातील इतर राज्यात तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश आंध्र प्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ येथे आजही बैलगाड्यांच्या शर्यती होत असतात, मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात शर्यतींना बंदी लावण्यात आली आहे. ही बंदी उठवावी व बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा राज्यात सुरू व्हाव्यात, यासाठी आपण दिल्लीत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राज्य शासन यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असून, यावर अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता म्हणून ॲड. मुकुल रोहतगी, ॲड. शेखर नापडे आणि ॲड. सचिन पाटील यांची नेमणूक केल्याची त्यांनी माहिती दिली.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …