बीसीसीआयने पाठिंबा दिला नाही – हरभजन

नवी दिल्ली – टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला बीसीसीआय (भारतीय क्रिकेट मंडळ)कडून खूप पाठिंबा मिळाला, पण इतर खेळाडूंना बीसीसीआयने तितका पाठिंबा दिला नाही. जर आणखी काही वेळ खेळण्याची संधी मिळाली असती, तर आणखी विकेट घेऊ शकलो असतो, अशी खंत फिरकीपटू हरभजन सिंग याने बोलून दाखवली आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना भज्जीने सांगितले की, धोनीला इतर खेळाडूंच्या तुलनेत बीसीसीआयकडून जास्त पाठिंबा मिळाला. इतरांनाही अशीच साथ मिळाली असती, तर त्यांनी चांगली कामगिरी केली असती. इतर खेळाडू आपली बॅट फिरवायला विसरले होते किंवा अचानक गोलंदाजी करायला विसरले, असे काही नव्हते. पण त्यावेळी बीसीसीआयने धोनीला सर्वात जास्त पाठिंबा दिला आणि त्यामुळेच बाकीच्या खेळाडूंमध्ये चांगले वातावरण नव्हते. याचा परिणाम कुठेतरी कामगिरीवरही होत होता.
हरभजन सिंग २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत टीम इंडियाचा नियमित सदस्य होता, पण त्यानंतर तो संघाबाहेर होता. २०१६ मध्ये, तो भारतासाठी शेवटचा सामना खेळला, पण या पाच वर्षांत त्याला फार कमी संधी मिळाल्या आणि तो संघात येत-जात राहिला. अखेर २०२१ मध्ये त्याने क्रिकेटला अलविदा केला. आता निवृत्तीनंतर भज्जी आपल्या मनातील व्यथा बोलून दाखवत आहे. काही दिवसांपूर्वी हरभजनने खुलासा केला होता की, धोनीने मला संघातून का वगळले, हे विचारण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला कोणतेही उत्तर मिळाले नाही आणि नंतर त्याने विचारणेच बंद केले होते. यावेळी किमान हकालपट्टीचे कारण तरी द्यायला हवे होते, असे भज्जीने म्हटले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …