बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन : सिंधूचे आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली – भारतीय अव्वल बॅडमिंटनपटू, गतविजेत्या पी. व्ही. सिंधूचे बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूला महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या चायनीज तैपेईच्या तै त्झु यिंगकडून १७-२१, १३-२१ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. अवघ्या ४२ मिनिटांत या सामन्याचा निकाल लागला. तै त्झुच्या वेगाशी जुळवून घेणे सिंधूला जमले नाही. सिंधूने या सामन्यात अनेक चुका केल्या. त्यामुळे तै त्झूचे काम अधिक सोपे झाले. ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक विजेती कामगिरी करणाऱ्या सिंधूचा यावर्षी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तै त्झुने पराभव केला होता. सिंधू जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. तै त्झुने एकप्रकारे हिशोब चुकता केला. याच स्पर्धेत २०१९ साली सिंधूने तै त्झुला पराभूत केले होते.
सिंधूने गुरुवारी थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँगचा सरळ गेममध्ये पराभव करीत या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. स्पेनच्या कॅरोलिना मरीन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवँगचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली होती. या स्पर्धेत सहावे मानांकन लाभलेल्या सिंधूने चोचुवँगवर २१-१४, २१-१८ अशी सरळ सेटमध्ये मात केली होती. या सामन्यात सिंधूने चोचुवँगला कुठेही वरचढ होण्याची संधी दिली नाही. आपल्या खेळाने पूर्णपणे तिला निष्प्रभावी करून टाकले होते. सहाव्या मानांकित सिंधूचा पोर्नपावीविरुद्धच्या आठ सामन्यांमधील हा पाचवा विजय होता. पण शुक्रवारी सिंधूला तसा खेळ करणे शक्य झाले नाही. तै त्झुने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करीत सिंधूवर शानदार विजयाची नोंद केली.
याआधी पी.व्ही. सिंधूला इंडोनेशिया ओपन १००० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थायलँडच्या रेचानोक इंतानोनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या रेचानोक इंतानोनने तिला ५४ मिनिटांत १५-२१, २१-९ आणि २१-१४ ने पराभूत केले होते. बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टुर्नामेंटमध्ये सिंधू अंतिम सामन्यात पराभूत झाल्यामुळे तिचे सुवर्ण पदक हुकले होते. तिला दुसऱ्या स्थानासह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. सिंधूला दक्षिण कोरियाच्या एन सेयुंगने मात दिली होती. पीव्ही सिंधू आणि एन सेयुंग यांच्यातील सामना सुरुवातीपासूनच एकतर्फी होत होता. एन सेयुंगने सुरुवातीपासून आपला दबदबा कायम ठेवला. त्यामुळे सिंधूला सामन्यात आगमन करण्याचा वेळ मिळालाच नाही.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …