नवी दिल्ली – दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेता पी. व्ही. सिंधू आणि जगातील माजी क्रमांक एक खेळाडू किदाम्बी श्रीकांत विश्व बॅडमिंटन महासंघा (बीडब्ल्यूएफ)च्या नव्या क्रमवारीत आपल्या स्थानी कायम आहेत, पण सात्विक साईराज रंकारेड्डी व चिराग शेट्टी ही पुरुष दुहेरी जोडी इंडिया ओपनमध्ये विजयानंतर दोन क्रमांक पुढे आठव्या स्थानी पोहचली.
माजी विश्व चॅम्पियन सिंधू महिलांच्या क्रमवारीत ९०९९४ गुणांसह सातव्या स्थानी आहे, तर श्रीकांत पुरुषांच्या यादीत ६९१५८ गुणांसह दहाव्या स्थानी कायम आहे. चिनी तैपेईची ताय त्जू महिलांच्या क्रमवारीत १०८८०० गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर सध्याचा ऑलिम्पिक चॅम्पियन विक्टर एक्सेलसनने ११६७७९ गुणांसह पुरुषांच्या यादीत अव्वल स्थान कायम राखले. भारताच्या दृष्टिकोनातून या यादीत सर्वात जास्त फायद्यात सात्विक साईराज व चिरागची पुरुष भारतीय दुहेरी जोडी राहिली. या जोडीने ७६७०८ गुणांसह दोन स्थानांची सुधारणा केली. त्यांनी रविवारी योनेक्स-सनराइज इंडिया ओपनमध्ये अग्रमानांकन प्राप्त इंडोनेशियाच्या मोहम्मद अहसान व हेंड्रा सेतियावान या जोडीचा २१-१६, २६-२४ असे पराभूत करत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. महिला दुहेरी व मिश्र दुहेरी क्रमवारीत कोणताच भारतीय जोडीदार नाही.