झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले असून, त्यातील व्यक्तिरेखांवर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेतील ओम ही व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय आहे. अभिनेता शाल्व किंजवडेकर ही व्यक्तिरेखा चोख बजावत असून या व्यक्तिरेखेमुळे शाल्वचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
बालदिनानिमित्त शाल्वने त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्याच्या लहानपणीच्या काही मजेदार गोष्टी शेअर केल्या. लहानपणी सगळ्यात जास्त आवडणाऱ्या गोष्टींबद्दल सांगताना तो म्हणाला, लहानपणी आम्ही खूप सायकलिंग करायचो. सोसायटीमध्ये गल्ली, डोंगरावरून आम्ही सायकलिंग करायचो. सायकलवरून आम्ही पकडापकडी आणि लपाछपी खेळायचो. माझे वडील मला सुपरबाईक्स गॅरेजमध्ये घेऊन जायचे आणि सुपर कार्स दाखवायचे. त्या जागेचा वास, त्या गाड्यांचे आवाज, त्यांचे स्पेअर पार्टस या गोष्टी माझ्या मनामध्ये खोलवर बसलेल्या आहेत. तिथूनच मला कार आणि बाईक्सची आवड निर्माण झाली. लहानपणी कुठल्या गोष्टीवरून जास्त ओरडा मिळाला याबद्दल सांगताना शाल्व म्हणाला, मला लहानपणी अभ्यासावरून खूप जास्त ओरडा मिळाला आहे. त्यानंतर माझ्या आई बाबांना लक्षात आले की माझी अभ्यासात गोडी निर्माण होणे कठीण आहे. त्यामुळे मला ज्या गोष्टी आवडतात त्यात त्यांनी मला सपोर्ट केला.