ठळक बातम्या

बांगलादेशचे पहिले हिंदू सरन्यायाधीश सुरेंद्र कुमार सिन्हांना ११ वर्षे तुरुंगवास

ढाका – बांगलादेशाचे माजी सरन्यायाधीश न्या. सुरेंद्र कुमार सिन्हा यांना मनी लाँड्रिंग आणि विश्वास भंग केल्याप्रकरणी ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्या. सुरेंद्र कुमार सिन्हा हे बांगलादेशचे पहिले हिंदू धर्मीय सरन्यायाधीश होते. ढाका विशेष न्यायदंडाधिकारी शेख नजमुल आलम यांनी माजी सरन्यायाधीश न्या. सुरेंद्र कुमार सिन्हा यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी ७ वर्षांची आणि विश्वासभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी ४ वर्षांची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगावयाच्या आहेत. ७० वर्षीय न्या. सुरेंद्र कुमार सिन्हा सध्या अमेरिकेत राहतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांना ही शिक्षा सुनावली गेली.
आपल्या निकालात न्यायालयाने म्हटले आहे की, न्या. सिन्हा हे मनी लाँड्रिंगच्या लाभार्थ्यांमध्ये तितकेच सहभागी आहेत. न्या. सिन्हा यांनी आता पद्मा बँक म्हणून ओळखली जाणाऱ्या फार्मर्स बँकेकडून ४ लाख ७० हजार अमेरिकन डॉलर्सचे (सुमारे ३.५० कोटी) कर्ज घेतले. त्यानंतर, पे-ऑर्डरद्वारे ते सिन्हा यांच्या वैयक्तिक खात्यात हस्तांतरित करण्यात आले. न्या. सिन्हा यांनी ही रक्कम रोक, धनादेश आणि पे ऑर्डरद्वारे दुसऱ्या खात्यात हस्तांतरीत केल्याचा आरोप आहे. असे करणे बांगलादेश भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे.
न्यायालयाने मोहम्मद शाहजहान आणि निरंजन चंद्र साहा यांच्यासह दहा जणांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. उर्वरित सात आरोपींना वेगवेगळ्या मुदतीची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला.
न्या. सिन्हा हे जानेवारी २०१५ ते नोव्हेंबर २०१७ या काळात बांगलादेशचे २१वे सरन्यायाधीश होते. त्यांच्यावर सरकारकडून भ्रष्टाचाराचा आरोप केला गेला होता. चार वर्षांपूर्वी परदेश दौऱ्यावर असताना न्या. सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बांगलादेशातील सध्याच्या ‘अलोकशाही’ आणि ‘निरपेक्ष’ राजवटीला विरोध केल्यामुळे त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …