- संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दणका
- सोमवारी आणखीन १७४ संपकरी बडतर्फ
मुंबई – ज्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, ती मागे घेतली जाणार नाही, असे स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोमवारी दिले.
विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सोमवारी अनिल परब यांनी एसटी कर्मचारी बडतर्फीच्या कारवाईिवषयी माहिती दिली. यावेळी, जे एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावरील बडतर्फ कारवाई मागे घेणार नाही, असे स्पष्ट उत्तर एसटी कर्मचाऱ्यांविषयी शशिकांत शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अनिल परब यांनी दिले. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती, ती आता मागे घेतली जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मागील आठवड्यातच अर्थमंत्री अजित पवार यांनीही एसटी महामंडळ विलिनीकरणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली होती. प्रत्येकाने विलिनीकरणाचा हट्ट केला, तर हे शक्य नाही. पगारवाढ झाली पाहिजे हे नक्की. पगाराची हमी आम्ही घेतली आहे. १० तारखेच्या आत पगार मिळणार आहे. कॉलेज सुरू झाले असून, विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावे, असे म्हणत अजित पवार यांनी विलिनीकरणाच्या मागणीला स्पष्टपणे नकार दिला.
– सोमवारी १७४ संपकरी बडतर्फ
संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवरील बडतर्फीची कारवाई सुरूच असून, सोमवारी १७४ एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत एकूण ४१५ संपकरी कर्मचारी बडतर्फ झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईला आता अधिक वेग आला आहे. शुक्रवारपर्यंत एकूण २४१ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आलेल्या सलगच्या सुट्ट्यांमुळे ही कारवाई थंड झाली होती. आता पुन्हा या कारवाईला वेग आला असून, सोमवारी पुन्हा १७४ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.