बंडखोरी वाढणार

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली, त्यात पक्षाचे नेतृत्व तूर्तास सोनिया गांधींनी करावे यावर शिक्कामोर्तब झाले. त्याला ४८ तासही उलटले नाहीत, तोच पक्षांतर्गत धूसफूस बाहेर येताना दिसत आहे. या धूसफुशीचे रूपांतर बंडखोरीत होणार का?, अशी शंका आता निर्माण झालेली आहे. याचे कारण ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी गांधी कुटुंबाने आता काँग्रेस नेतृत्वापासून दूर व्हावे, असे स्पष्टपणे म्हटले आहे. या सुरात सूर मिसळण्यासाठी आणखी कोण पुढे येतो हे आता लवकरच दिसून येईल.

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारी समितीची आत्मपरीक्षण बैठक रविवारी झाली. या बैठकीच्या दुसºया दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सोमवारी गांधी कुटुंबाबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. गांधी कुटुंबाने काँग्रेसच्या नेतृत्वापासून बाजूला व्हावे आणि इतर एखाद्या व्यक्तीला संधी द्यावी, असे रोकठोक मत सिब्बल यांनी व्यक्त केले आहे. हे वक्तव्य गांभीर्याने घेतले पाहिजे. एकेकाळी राहुल गांधींच्या अवतीभवती असणाºया कपिल सिब्बल यांचे हे वक्तव्य आहे. त्याची दखल पक्षाने घेतली पाहिजे.
पक्षाने आयोजित केलेल्या विचारमंथनाच्या कार्यक्रमासंदर्भातही सिब्बल यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे नेतृत्व हे फार संकुचित विचार करत असून, त्यांना मागील आठ वर्षांमध्ये पक्षाची पडझड का होतेय याची कारणे ठाऊक नसल्याचा टोला सिब्बल यांनी लगावला आहे.

२०२० साली काँग्रेसमधील जी-२३ गटाने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे एका पत्राद्वारे पक्षाच्या कारभारासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. या पत्रावर स्वाक्षरी करणाºया नेत्यांपैकी एक असणाºया सिब्बल यांनी अनेकदा पक्षामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. गांधी कुटुंबाने काँग्रेसचे नेतृत्व सोडावे, अशी मागणी करणारे सिब्बल हे पहिलेचे मोठे नेते आहेत. गांधींनी स्वेच्छेने बाजूला व्हावे, कारण त्यांनी नियुक्त केलेले मंडळातील लोक कधीच त्यांना तुम्ही नेतृत्व सोडा असे सांगणार नाही, असे सिब्बल म्हणाले आहेत. त्यामुळे पत्र लिहिणारे २३ लोक आता आक्रमक होऊन काँग्रेस वाचवण्यासाठी पुढे येतील, असे दिसते. ही काँग्रेसमधील बंडखोरी एका नव्या बदलाचे संकेत देतील. या २३ लोकांनी विचार केला आणि वातावरण ढवळून काढले, तर गांधी कुटुंबीयांनी स्वेच्छेने आपण होऊन नेतृत्व सोडले नाही, तर त्यांना हटवले जाईल अशी परिस्थिती आहे. पक्षाला केव्हा ना केव्हा तरी निवडणुका घ्याव्या लागतील. या निवडणुकीत एखादा सक्षम नेता अध्यक्षपदासाठी जर गांधी कुटुंबातील नेतृत्वाविरोधात उभा राहिला, तर गांधी कुटुंबाला पराभवाची धूळ चारल्याशिवाय हे लोक राहणार नाहीत हे नक्की. म्हणूनच गांधी कुटुंबीयांनी सिब्बल यांच्या मताचा विचार केला पाहिजे. हे मत प्रातिनिधीक स्वरूपाचे आहे. बाकीच्यांच्या मनात आहे, सिब्बल यांनी फक्त बोलून दाखवले आहे.
पण ही बंडाची पडलेली ठिणगी गांधीविरुद्ध उर्वरित काँग्रेस अशा स्वरूपात दिसून आल्याशिवाय राहणार नाही. गांधी कुटुंबीय जेवढी निवडणूक पुढे ढकलतील, तेवढी त्यांची अप्रतिष्ठा होईल. आज पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याना सर्वसमावेशक नेतृत्व हवे आहे. तसे नेतृत्व निर्माण करणे अवघड नाही. पण त्यासाठी या घराण्याने आपण होऊन दूर झाले पाहिजे. गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेस व्यर्थ आहे असे म्हणणे चुकीचे आहे. राजीव गांधींच्या निधनानंतर त्यांचे कुटुंबीय परदेशात गेले. त्यावेळी गांधी परिवार नसताना नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अल्पमतातील सरकार पाच वर्ष टिकवले होते. त्यानंतर झालेल्या पराभवानंतर कोणाला तरी साक्षात्कार झाला आणि सोनिया गांधींना जबरदस्तीने राजकारणात आणले गेले. त्यामुळे त्यांचाही समज झाला की, आपण नसलो तर काँग्रेसचे अस्तित्वच नसेल. या भ्रमातून काँग्रेसला बाहेर काढणे आवश्यक आहे. हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत काँग्रेसला सत्तेचे स्वप्न पाहता येणार नाही. यश मिळणार नाही. कारण आज बंडखोरीच्या उंबरठ्यावर काँग्रेस आहे. केव्हा बंड पेटेल हे सांगता येत नाही.

सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे की, कार्यकारी समितीच्याबाहेरही काँग्रेस पक्ष आहे. त्यांची मतही ऐकून घ्यावीत. आमच्यासारखे अनेक नेते आहेत, जे कार्यकारी समितीमध्ये नाहीत, पण ते काँग्रेस पक्षात असून त्यांची मत वेगळी आहेत. की आम्ही कार्यकारी समितीत नाही म्हणून आमच्या मतांचा फरक पडत नाही असे आहे का? त्यामुळेच कार्यकारी समिती म्हणजेच संपूर्ण भारतामधील काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करते असे त्यांना वाटते. मला नाही वाटत हे योग्य आहे. देशभरामध्ये काँग्रेसचे अनेक नेते आहेत. केरळ, आसाम, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरातमधील काँग्रेस नेत्यांची वेगळी मते आहेत, असे सिब्बल म्हणाले आहेत. ही अप्रत्यक्षपणे दिलेली तंबीच आहे. ज्या ज्या राज्यांचा त्यांनी उल्लेख केला आहे तिथे बंडखोरी अटळ आहे. तेथील काँग्रेस गांधी कुटुंबीयाच्या विरोधात गेलेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ही बडखोरीला झालेली सुरुवात आहे.
आपली भूमिका मांडताना कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केले की, मी सर्वांच्या वतीने बोलू शकत नाही, पण पूर्णपणे माझे वैयक्तिक मत मांडायचे झाल्यास किमान मला तरी सब की काँग्रेस असा पक्ष हवाय, तर काहींना घर की काँग्रेस हवाय. अर्थात मला घर की काँग्रेस नकोय. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सब की काँग्रेससाठी झगडत राहील. या सब की काँग्रेसचा अर्थ केवळ एकत्र येणे हा नाहीय. तर ज्यांना देशामध्ये भाजप नकोय अशा लोकांनी एकत्र येणे असा आहे. असे सिब्बल म्हणाले आहेत. काहींना वाटते की, काँग्रेस अमुक एका व्यक्तीशिवाय काहीच नाहीय. ही तीच लोक आहेत ज्यांना सब की काँग्रेस ही घर की काँग्रेस शिवाय टिकू शकत नाही असे वाटते. हे एक आव्हान आहे. हे काही एखाद्या व्यक्तीविरोधातील धोरण नाहीय, असे सिब्बल म्हणाले. याचा अर्थ कपिल सिब्बल आणि २३ नेते संपूर्ण देशभरातून काँग्रेस पिंजून काढतील आणि एखादे बंड उभे करतील. अर्थात काँग्रेसला संजिवनी मिळण्यासाठी ती आवश्यक बाब आहे.

– प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

उखाणा

सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात …