बँक कर्मचाऱ्यांचा २३-२४ फेब्रुवारीला संपाचा इशारा

चार दिवस कामकाज राहणार ठप्प


नवी दिल्ली – सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांचे कर्मचारी २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी संपावर जाणार आहेत. डिसेंबर महिन्यात देखील याच कारणामुळे बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता, मात्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने बँक कर्मचारी संघटनांनी पुन्हा संपाची हाक दिली आहे. २३ आणि २४ फेब्रुवारीला बँक कर्मचारी संघटना संपावर गेल्यास २३ ते २७ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच पाच दिवसांपैकी चार दिवस बँकांमधील कामकाज ठप्प राहणार आहे. २३ आणि २४ रोजी संपामुळे आणि २६-२७ फेब्रुवारीला अनुक्रमे चौथा शनिवार आणि रविवार ही सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने बँकेत कोणतेही काम होणार नाही. परिणामी चार दिवस आर्थिक व्यवहार ठप्प होणार आहेत.
सेंट्रल ट्रेड युनियन्स (सीटीयू) आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए) सह इतर संघटनांनी संयुक्तपणे बँक संपाची घोषणा केली आहे. देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांचे कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने आर्थिक व्यवहार पूर्णत: ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत एआयबीईएचे सरचिटणीस सी. एच. व्यंकटचलम यांनी सर्व बँक संघटना आणि सदस्यांना पत्र जारी करून या संपात सहभागी होण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. पत्रात ते म्हणाले की, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दोन सरकारी बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ गेल्या वर्षी १५ आणि १६ मार्च रोजी गोंधळ घातला होता. बँकिंग कायदे (दुरुस्त) विधेयक २०२१च्या निषेधार्थ १६ आणि १७ डिसेंबर २०२१ रोजी संप करण्यात आला होता. आता २३ आणि २४ फेब्रुवारीला पुन्हा संपासाठी सज्ज व्हा, असे त्यांनी म्हटले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाच्या सरकारच्या योजनेला विरोध करण्यासाठी बँक संघटनांनी गेल्या महिन्यात १६ आणि १७ डिसेंबर रोजी संप केला होता. त्यानंतर बँक संपाचा परिणाम भारतीय स्टेट बँक (एसबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि आरबीएल बँकेच्या कामकाजावर झाला होता. चेक क्लिअरन्स, फंड ट्रान्सफर, डेबिट कार्ड यासंबंधीचे कामही रखडले होते.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …