ठळक बातम्या

बँकिंग क्षेत्रातील नव्या धोरणांचा ठेवीदारांना फायदा – पंतप्रधान मोदी

ठेवीदारांना तीन महिन्यांत पैसे परत मिळणार
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीमध्ये बँक ठेवी विमा कार्यक्रमात ठेवीदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. पूर्वी जर एखाद्या बँकेचे दिवाळे निघाले, तर ठेवीदारांचे पैसे त्यांना परत मिळतीलच याची खात्री नव्हती, तसेच ते कधीपर्यंत मिळतील याचादेखील कोणताही निश्चित कालावधी नव्हता, मात्र आता ठेवीदारांच्या समस्येवर सरकारने कायमस्वरूपी तोडगा शोधून काढला आहे. आता कोणतीही बँक डबघाईला आली किंवा तिचे दिवाळे निघाले, तर ठेवीदारांना त्यांचा पैसा ९० दिवसांच्या (तीन महिने) आत परत मिळणार आहे. केंद्राच्या या नव्या कायद्यानुसार गेल्या काही दिवसांमध्ये एक लाखांपेक्षा अधिक ठेवीदारांना त्यांचे अनेक वर्षांपासून बँकेत अडकलेले पैसे परत मिळाले आहेत. ही रक्कम जवळपास १३०० कोटी रुपयांच्या घरात आहे, असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, नागरिक कष्ट करतात, त्यातून मिळणाऱ्या पैशांची बचत करतात. ही बचत ते मोठ्या विश्वासाने बँकेच्या हाती सोपवतात. मात्र अचानक बँकेचे दिवाळे निघाले, तर त्यांचे पैसे बँकेत अडकून पडतात. हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होते, मात्र आता हे सर्व बंद झाले आहे. कोणत्याही कारणाने बँकेच्या व्यवहारावर प्रतिबंध आले, तरीदेखील ठेवीदारांना त्यांचे पैसे तीन महिने म्हणजे ९० दिवसांच्या आत मिळतील, अशी तरतूद आता करण्यात आली आहे. पूर्वी एखाद्या बँकेचे दिवाळे निघाले, तर जनतेला आपले पैसे परत मिळतील याची कोणतीच खात्री नव्हती, मात्र त्यानंतर अशा परिस्थितीमध्ये ठेवीदारांच्या ५० हजार रुपयांपर्यंतच्या रकमेची जबाबदारी सरकारने घेतली. त्यानंतर हे प्रमाण वाढून एक लाखांपर्यंत नेण्यात आले आणि आता बँकेचे दिवाळे निघाले, तरी देखील ठेवीदारांना ९० दिवसांच्या आत पाच लाखांपर्यंतच्या ठेवी परत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे ९८ टक्के खात्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ठेवीदारांचे सुमारे ७६ लाख कोटी रुपये पूर्णपणे सुरक्षित आहेत, असे सर्वसमावेशक सुरक्षा कवच विकसित देशांमध्येही नाही, असे मोदींनी स्पष्ट केले.

About Sub-Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …