बँकांच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी आक्रमक

आज व उद्या बँका राहणार बंद?

नवी दिल्ली – बँक कर्मचाऱ्यांच्या विविध युनियनकडून बँकांच्या खासगीकरणाविरोधात आज म्हणजे १६ डिसेंबर आणि शुक्रवार १७ डिसेंबरला संप पुकारण्यात आला आहे. या दोन दिवसांच्या देश पातळीवरील संपाच्या काळात बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. बँक कर्मचाऱ्यांना बँक व्यवस्थापनाकडून संपावर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बँक कर्मचारी युनियनने मात्र संपाची भूमिका कायम ठेवल्याचे समोर येत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचे आवाहन केले आहे. बँकेने, कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणू संसर्गाची स्थिती पाहता ग्राहकांच्या हितासाठी संपावर न जाण्याचे आवाहन केले आहे. एसबीआय कर्मचारी संघटनांना चर्चेचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. तर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने देखील कर्मचारी संघटनांना आपल्या ग्राहकांच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे. तर, अशाच प्रकारचे आवाहन पंजाब नॅशनल बँकेने कर्मचाऱ्यांना केले. दरम्यान, बँकांचे प्रमुख, बँक असोसिएशन आणि बँक कर्मचारी युनियन यांच्यात चर्चा सुरू आहे. बँक व्यवस्थापन सातत्याने संप रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. २०२१च्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांच्या खासगीकरणासंदर्भात बनवलेल्या कमिटीसंदर्भात बोलताना दोन बँकांचे खासगीकरण करणार असल्याचे म्हटले होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत बोलताना २०२१-२२ या आर्थिक वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. कोणत्या बँकांचे खासगीकरण करायचे यासंदर्भातील निर्णय देखील बँक खासगीकरण समिती घेणार आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …