ठळक बातम्या

प्रेक्षकांची प्रतीक्षा

गेल्या २० वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीने कात टाकली असून, नवनवीन चांगले चित्रपट आणि प्रयोग मराठीत होत होते. त्यामुळे बॉलीवूडच्या दिग्गजांनाही मराठी चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले होते. अनेक दाक्षिणात्य निर्मातेही मराठी चित्रपटात पैसा गुंतवू लागले होते; पण गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आले आणि मराठी चित्रपटसृष्टी संकटात सापडली. अनेकांनी गुंतवलेले चित्रपट अडकून पडले. कोणाचे प्रदर्शनासाठी, तर कुणाचे चित्रीकरण रखडले. त्यामुळे निर्माते, कलाकार सगळेच अडचणीत आले. मागच्या आठवड्यात २२ आॅक्टोबरला चित्रपटगृह सुरू झालेली आहेत; पण एकही मराठी चित्रपट त्यादिवशी प्रदर्शित होऊ शकला नाही. प्रेक्षक किती येतात याचा अंदाज नसल्याने कोणीही पहिल्या आठवड्यात चित्रपट प्रदर्शित केला नाही. आजही तेच चित्र आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत मराठी चित्रपट रखडत आहे, असे दिसते.
गेल्या काही वर्षांपासून साधारणपणे वर्षाला ५० ते ६० मराठी चित्रपट बनत होते. प्रदर्शित होत होते. त्यातील किमान डझनभर चित्रपट चांगले गाजतही होते; पण लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळात आलेल्या संकटामुळे २०२१ या वर्षात जेमतेम १३ चित्रपट प्रदर्शित होऊ शकत आहेत. पण त्यांनाही फारसा धंदा मिळण्याची आशा नाही.

गेल्यावर्षी दिवाळीनंतर अनलॉक झाल्यावर जानेवारी महिन्यात २ चित्रपट प्रदर्शित झाले होते. एक २२ जानेवारीला आणि दुसरा २९ जानेवारीला प्रदर्शित झाला. त्या चित्रपटांची नावे होती, पिटर आणि बस्ता. यातला बस्ता हा महत्त्वाकांक्षी चित्रपट होता. सायली संजीव आणि पार्थ भालेराव यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या, तर तानाजी घाडगे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता; पण दोनच महिन्यांत पुन्हा लॉकडाऊन झाल्यामुळे हा चित्रपट सर्वांपर्यंत पोहोचू शकला नाही.
फेब्रुवारी महिन्यात एकूण ६ मराठी चित्रपट प्रदर्शित झाले होते. यापैकी १२ फेब्रुवारीला एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. ते होते ओह माय घोस्ट आणि दुसरा होता एक ती. ओह माय घोस्टमध्ये प्रथमेश परब, पंकज विष्णू आणि काजल शर्मा हे कलाकार होते, तर त्याचे दिग्दर्शन वासीम खान याने केले होते. एक तीमध्ये विजय कदम आणि प्रेमा किरण हे प्रमुख भूमिकेत होते. अमर पारखी याने त्याचे दिग्दर्शन केले होते.

१९ फेब्रुवारीलाही एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित झाले. त्या चित्रपटांची नावे होती कानभट्ट आणि प्रितम. या दोन चित्रपटांना आधीच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या दोन चित्रपटांची स्पर्धा करत प्रेक्षक मिळवायचे होते. या खटापटीत चारही चित्रपटांना आर्थिक फटका बसला. कानभट्टचे दिग्दर्शन अपर्णा होशिंगने केले होते, त्यात भव्या शिंदे आणि ऋग्वेद मुळे यांच्या प्रमुख भूमिका होत्या, तर प्रितमचे दिग्दर्शन सिजोरॉकी याने केले होते. यात उपेंद्र लिमये, प्रणव रावराणे, नक्षत्र मेढेकर आणि अजित देवळे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
त्यानंतर २६ फेब्रुवारीला बेफाम हा चित्रपट प्रदर्शित झाला. कृष्णा कांबळे दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, सखी गोखले आणि विद्याधर जोशी यांच्या भूमिका होत्या. त्या पाठोपाठ पुंडलिक धुमाळ दिग्दर्शित पेन्शन हा चित्रपट फेब्रुवारीतच प्रदर्शित झाला. यात सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत होती; पण या सहाही चित्रपटांना फारसे व्यावसायिक यश मिळाले नाही, कारण नुकतेच सगळे सुरू झालेले होते. प्रेक्षक अजूनही चित्रपटगृहांकडे वळलेले नव्हते आणि पाठोपाठ प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटांची स्पर्धा होती.

मार्च महिन्यात त्यामुळे फक्त एकच चित्रपट प्रदर्शित झाला. तो म्हणजे हॅशटॅग प्रेम. मिताली मयेकर आणि सुयश टिळक या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते आणि त्याचे दिग्दर्शन राजेश जाधवचे होते. १९ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला. लोकांनी बाहेर पडायला नुकतीच सुरुवात केली होती; पण त्याचवेळी दुसºया लाटेचे वादळ घोंगावायला लागले होते.
तरीही एप्रिल महिन्यात पुन्हा ५ चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी ९ एप्रिलला २ चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. ते होते झॉलीवूड आणि दुसरा होता वेल डन बेबी. झॉलीवूडचे दिग्दर्शन तृशांत इंगळेनी केले होते. या चित्रपटात अश्विनी लाडेकर आणि दिनकर गावंडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. वेल डन बेबीमध्ये अमृता खानविलकर, पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते हे कलाकार होते.

त्यानंतर १६ एप्रिलला पुन्हा दोन चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी एक होता स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका असलेला बाली हा चित्रपट. पूजा सावंत आणि समर्थ जाधव यांच्या यात भूमिका होत्या. याचे दिग्दर्शन विशाल फुरीयाने केले होते, तर दुसरा चित्रपट होता फ्री हीट दणका. याचे दिग्दर्शन सुनील मगरे यांनी केले होते, तर त्यात सोमनाथ अवघडे आणि अरबाज शेख यांच्या भूमिका होत्या. त्यानंतर ३० एप्रिलला द डिसीपल हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित या चित्रपटात आदित्य मोडक आणि अरुण द्रवीड हे कलाकार होते. या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांची प्रतीक्षा होती; पण १३ एप्रिलपासूनच निर्बंध वाढू लागले आणि या सर्व चित्रपटांना फटका बसला.
त्यानंतर मागच्या आठवड्यात २२ आॅक्टोबरला चित्रपटगृह सुरू झाली आहेत; पण अजून एकही चित्रपट प्रदर्शित केला नाही. याचे कारण प्रेक्षकांची प्रतीक्षा आहे. येत्या काही दिवसांत तीन चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहेत. पुढील महिन्यात १९ नोव्हेंबरला हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा हा चित्रपट प्रदर्शित होईल. यात निर्मिती सावंत, सिद्धांत चांदेकर आणि सोनाली कुलकर्णी आहेत, तर डिसेंबर महिन्यात दोन चित्रपट प्रदर्शित होतील. त्यापैकी एक आहे, निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी हा चित्रपट. यामध्ये विक्रम गोखले, नीना कुलकर्णी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर दुसरा चित्रपट आहे, समीर आशा पाटील दिग्दर्शित डार्लिंग. यामध्ये प्रथमेश परब आणि ऋतिका श्रोत्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

एकंदरीत २०२१ या वर्षात कसेबसे १३ चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यापैकी दहा प्रदर्शित झाले आहेत आणि तीन पुढील काळात होतील; पण हे सगळे प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रफुल्ल फडके/द स्क्रीन

9152448055\\

About Editor

अवश्य वाचा

शरद पवारांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल”: नारायण

राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण …