‘प्रलय’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भारताची लष्करी ताकद वाढली
बालासोर (ओडिशा) – भारताने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘प्रलय’ या क्षेपणास्त्राची बुधवारी सकाळी यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र १५० किमी ते ५०० किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करू शकणार आहे. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारताची लष्करी ताकद वाढली आहे. चीन आणि पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे भारत आपली लष्करी ताकद वाढवत आहे. ओडिशामधील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (डीआरडीओ)ने विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र एक टनापर्यंतची युद्धसामग्री वाहून नेऊ शकते.
यापूर्वी भारताने अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या मध्यम पल्ल्याच्या ‘अग्नी प्राइम’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. दोन हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राचीही ओडिशातील बालासोर येथेच चाचणी घेण्यात आली होती. हे क्षेपणास्त्रही डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. अग्नी-१ आणि अग्नी-२ मालिकेतील क्षेपणास्त्रांपेक्षा ‘अग्नी-प्राइम’ अधिक प्रगत आहे. त्याची रेंज कमी असली, तरी त्यात अग्नी-५ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळेच शत्रूच्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेला चकवा देण्यातही ते यशस्वी होऊ शकते. भारताने हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या कमी पल्ल्याच्या आण्विक क्षेपणास्त्रांविरोधात तयार केले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला भारताने दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली होती. ८ डिसेंबर रोजी भारताने सुखोई लढाऊ विमानातून सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्रह्मोस’च्या हवाई आवृत्तीची यशस्वी चाचणी घेतली होती. ओडिशातील चांदीपूर एकात्मिक चाचणी तळावरून या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ‘ब्रह्मोस’ हे विकासातील एक मोठे यश असल्याचे वर्णन केले आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजे ७ डिसेंबरला भारताने पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. ही हवाई संरक्षण यंत्रणा केवळ १५ किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करू शकते. नौदलाच्या युद्धनौकांसाठी डीआरडीओने हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. या क्षेपणास्त्रामुळे नौदलाच्या युद्धनौकांसाठी हवेतून येणारा धोका हवेतच नष्ट होईल. हे क्षेपणास्त्र जुन्या बराक-१ सरफेस टू एअर क्षेपणास्त्राची जागा घेईल. त्यामुळे हवेतील धोक्यांपासून ३६० अंश संरक्षण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

About Sub-Editor

अवश्य वाचा

अग्रलेख : समताधिष्टित राष्ट्राच्या निर्मितीचा पाया

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१वी जयंती. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. संपूर्ण …