प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

हिंगोली – काँग्रेसचे नेते, दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसच्यावतीने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागेल, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्याठिकाणी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी विधान परिषदेचे तिकीट प्रज्ञा सातव यांना दिल्याचे प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले आहे.
खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल, अशी चर्चा होती. मात्र प्रज्ञा सातव यांना राज्यसभेचे तिकीट नाकारण्यात आले आणि काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. तरीदेखील गेल्या काही महिन्यांपासून प्रज्ञा सातव हिंगोली-कळमनुरीतील राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. याचदरम्यान विधान परिषद आमदार शरद रणपिसे यांचे निधन झाले. या जागेसाठी चंद्रकांत हंडोरे,नसीम खान, जितेंद्र देहाडे या नेत्यांची नावे चर्चेत होती, परंतु दिवंगत खासदार राजीव सातव यांचे दिल्लीत असलेले वजन, गांधी कुटुंबीयांशी घनिष्ठ संबंधामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे.

 

About Sub-Editor

अवश्य वाचा

एकामागून एक हल्ल्यामुळे खारूताईची पसरली दहशत

  कोरोना विषाणूने जगात पुन्हा धुमाकूळ घातला आहे. यावेळी ओमिक्रॉनने लोकांना घाबरवले आहे. लसीकरण झालेल्या …